Created By: factcrescendoTranslated By: ऑनलाइन लोकमत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका रॅलीदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसण्यापासून रोखल्याचं दिसत आहे. हा 11 सेकंदाचा व्हिडीओ एका रॅलीचा असून ज्यामध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. पंतप्रधान मोदी काही नेत्यांसोबत मंचावर बसले आहेत. याच दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या शेजारील खुर्ची हलवत आहेत. हे पाहून मोदी त्यांचा हात धरतात आणि पुढे जाण्याचा इशारा देतात. त्यानंतर योगी खुर्ची सोडतात आणि तेथून निघून जातात. आता सोशल मीडिया युजर्स हा व्हिडीओ खरा मानून शेअर करत आहेत. दोघांमध्ये मतभेद सुरू असल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यामुळे सर्वांसमोर मोदींनी योगी यांचा अपमान केला आणि त्यांना शेजारील खुर्चीवरून उठवून आणि हात खेचून निघून जाण्यास सांगितले. या कॅप्शनसह हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेश… पीलीभीत येथील जाहीर सभेच्या मंचावर मोदींनी रागाच्या भरात आणि उद्धटपणे योगी यांना हाताने ढकलून दिलं, ते खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करत होते. अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद. रामराज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हिंदुत्वाच्या नेत्याने केलेल्या घृणास्पद कृत्याला जबाबदार कोण? सनातनी मोदींकडून बदला घेणार की नाही? हा मोठा प्रश्न आहे कोण मोदींसोबत आणि कोण योगींसोबत? हा अपमान काही पहिल्यांदा झाला नसून यापूर्वीही मोदींनी अनेकदा केला आहे. योगींचे कुटुंब किती दिवस अत्याचार सहन करणार?
रिसर्चमधून समजलं की...
तपासाच्या सुरुवातीला, आम्ही व्हिडिओचा स्क्रीन शॉट घेतला आणि त्यातून मिळालेल्या फोटोची Google रिव्हर्स इमेज सर्च केली. परिणामी, आम्हाला न्यूज 24 च्या YouTube चॅनेलवर या रॅलीशी संबंधित व्हिडीओ सापडला, जो 9 एप्रिल 2024 रोजी अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनवरून असं दिसून येतं की हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील पीलीभीत शहरात आयोजित रॅलीचा आहे. त्याच व्हिडिओमध्ये योगी जनतेला संबोधित करण्यासाठी मागून जाणार असल्याचं सांगण्यात आलं. मोदींनी त्यांचा हात धरला आणि सीएम योगींना समोरून जाण्यास सांगितलं. या व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या क्लिप आहेत, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी योगींचा अपमान केल्याचे कुठेही दिसत नाही.
यानंतर या रॅलीशी संबंधित अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. ज्या सांगतात की, मोदी 9 एप्रिल 2024 रोजी निवडणूक रॅलीसाठी यूपीमधील पीलीभीत येथे पोहोचले होते. यावेळी व्यासपीठावर योगी आदित्यनाथ, भाजपा प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, संतोष गंगवार, जितिन प्रसाद यांच्यासह अनेक भाजपा नेते उपस्थित होते. याशिवाय, रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं गेलं आहे की पीएम मोदींनी योगींचा हात धरून खेचण्याचं खरं कारण म्हणजे त्यांचा मोठेपणा आहे. एक आदर्श उदाहरण देत त्यांनी योगींना समोरून जाऊ दिलं. तर योगी आपल्या शिष्टाचाराचे उदाहरण मांडत होते आणि ते पंतप्रधानांसमोर जात नव्हते.
या रॅलीचं पूर्ण व्हर्जन भाजपाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की, ते मंचावर येताच नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे बासरी, कमळाचं फूल, देवीचा फोटो देऊन स्वागत केलं. यानंतर पीएम मोदी आणि सीएम योगी शेजारी बसले. त्यानंतर नेत्यांचे स्वागत केल्यानंतर रॅलीचे संचालन करणाऱ्या महिला नेत्याने मुख्यमंत्री योगी यांना भाषणासाठी आमंत्रित केलं. त्यावर योगींनी खुर्ची काढून मागून व्यासपीठाकडे जाण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर पीएम मोदींनी त्यांचा हात धरून त्यांना समोरून जाण्याचा इशारा दिला. याआधी दोघेही एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये 3:30 मिनिटांनंतर, जेव्हा मुख्यमंत्री योगी यांना भाषणासाठी मंचावर बोलावण्यात आले तेव्हा ते व्यासपीठाकडे जाण्यासाठी खुर्ची काढून मागून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पीएम मोदी त्यांना समोरून जाण्याचा इशारा करतात.
त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की,व्हायरल व्हिडीओ हा अपूर्ण आहे आणि तो दिशाभूल करणारा आहे. मूळ व्हिडिओमध्ये योगी यांनी खुर्ची काढून मागून व्यासपीठाकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीएम मोदींनी त्यांचा हात धरून त्यांना समोरून जाण्याचे संकेत दिले.
निष्कर्ष -
वस्तुस्थिती तपासल्यानंतर, आम्हाला व्हिडीओ खोटा असल्याचे आढळले आहे, जो प्रत्यक्षात अपूर्ण आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह व्हायरल झाला आहे. मूळ व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी योगींचा अपमान केला नसल्याचे दाखवण्यात आले आहे. तर योगी आपल्या शिष्टाचाराचे उदाहरण देत होते आणि ते पंतप्रधानांसमोर जात नव्हते. तर त्याचवेळी मोदी त्यांना समोरून जाण्यास सांगत होते.
(सदर फॅक्ट चेक factcrescendo या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)