पुण्यात झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर शहरात निर्माण झालेली पूरसदृश परिस्थिती याची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. पुण्यात राहतो की पाण्यात?, अशा आशयाची मीम्स व्हायरल होत आहेतच, पण राजकीय टीका-टिप्पणीही जोरात सुरू आहे. "नव्या पुण्याच्या 'शिल्पकारांनी' केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय", असा टोला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला. त्यावर, "पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, इतका पाऊस पडल्यानंतर पाणी तुंबणारच", असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. या पार्श्वभूमीवर, देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो फेसबुकवर फिरतोय. अमृता यांनीच भाजपाच्या कारभाराची पोलखोल केल्याचा दावा या फोटोसोबत करण्यात आलाय. मात्र, अमृता फडणवीस यांचा जुना फोटो मॉर्फ करून दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह तो पोस्ट करण्यात आल्याचं 'लोकमत डॉट कॉम'ने केलेल्या पडताळणीत समोर आलं आहे.
काय आहे दावा?
ईशान चेतन तुपे या फेसबुक अकाउंटवर १८ ऑक्टोबर रोजी केलेल्या पोस्टमध्ये, अमृता फडणवीस यांचे दोन फोटो आहेत. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात अमृता फडणवीस उभ्या आहेत आणि 'थम्ब्स डाऊन' करत त्या नाराजी व्यक्त करत आहेत. त्यासोबत लिहिलेला मजकूर असाः ''सौ. अमृता देवेंद्र फडणवीस जी यांनी "तुंबलेल्या पुण्याचे शिल्पकार" श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना त्यांच्या गलथान कारभाराची प्रतिमा दाखवली. सोबत भाजपच्या मागील ५ वर्षाच्या कामांची पावती पुणेकरांसमोर ठेवली. धन्यवाद ताई, एक सामान्य पुणेकर." #BJPFailsPMC
म्हणजेच, अमृता फडणवीस यांनी पुणे महापालिकेतील भाजपाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत, असा पोस्टकर्त्याचा दावा आहे. तो चुकीचा असल्याचं समोर आलं आहे.
कशी केली पडताळणी?
ईशान चेतन तुपे यांनी पोस्ट केलेल्या फोटोंवर @Namrata_Uikey यांचं नाव होतं. 'लोकमत'ने गुगल सर्चद्वारे ते अकाउंट शोधायचा प्रयत्न केला. तेव्हा, या नावाचं ट्विटर अकाउंट सापडलं. त्यावर, १८ ऑक्टोबर रोजी हे दोन्ही फोटो ट्विट केले होते. त्यासोबत एक शेरोशायरीही होती. ती खालीलप्रमाणेः
इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब,पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब !#punerains #Monsoon2022 #PuneRain #Pune
त्यातील पहिली ओळ कॉपी करून गुगलवर सर्च केली, तेव्हा खुद्द अमृता फडणवीस यांचंच ट्विट आणि इन्स्टा पोस्टची लिंक सगळ्यात वर दिसली.
हे ट्विट आणि इन्स्टा पोस्ट १६ जुलै २०२१ रोजी केली आहे. त्यावरची शायरी तीच असली, तरी सोबतचे हॅशटॅग #MumbaiRains #Monsoon2021 #Mumbai असे आहेत. म्हणजे, २०२१ मध्ये मुंबईत पडलेल्या पावसावेळी रस्त्यांवर पाणी साचलं होतं आणि त्यावरून अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर - नाव न घेता - टीका केली होती.
हे फोटो आणखी बारकाईने पाहिल्यावर, अमृता फडणवीस यांनी पोस्ट केलेला फोटो आणि हा फोटो वेगळा असल्याचं दिसतं. मागे दिसणारी कार, साईन बोर्ड यात फरक दिसतो. आम्ही जेव्हा गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे असा आणखी फोटो शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा, पुणेरी गाईड या ट्विटर हँडलवर पुण्यातील पूरपरिस्थितीचे फोटो सापडले.
अमृता फडणवीस यांनी २०२१ मध्ये आपल्याच अकाउंटवरून पोस्ट केलेला मुंबईतील रस्त्यावरील फोटो 'क्रॉप' करून पुण्यातील रस्त्यांवर 'पेस्ट' यातून लक्षात येतं.
या संदर्भात, आम्ही अमृता फडणवीस यांच्याशीही संपर्क साधला. पुण्यात पाऊस झाला, तेव्हा त्या तिथे होत्या का, याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी बोललो. मात्र, दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी आपण पुण्यात गेलो होतो, त्यानंतर पुण्याला जाणंच झालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे हा फोटो पुण्यातील पावसानंतर काढलेला नाही, हे स्पष्ट होतं.
निष्कर्षः
अमृता फडणवीस यांनी पुणे महापालिकेतील भाजपाच्या कारभारावर टीका केली, देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या गलथान कारभाराची प्रतिमा दाखवली, हा दावा दिशाभूल करणारा आहे. अमृता फडणवीस यांचा जुना फोटो मॉर्फ करून पोस्ट केला असून पुण्यातील पावसाशी त्याचा कुठलाही संबंध नाही.