Created By: Vishvas NewsTranslated By: ऑनलाइन लोकमत
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू हे एनडीए बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये असा दावा केला जात आहे की, दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यांचं अभिनंदन केलं.
आमच्या तपासणीत हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं आम्हाला आढळलं. चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचा हा फोटो २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा नाही, तर २०२९ चा आहे, जो आता खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
काय होतंय व्हायरल?
सोशल मीडिया यूजर 'विशाका जातनी'ने व्हायरल फोटो (अर्काइव लिंक) शेअर केला आहे, ज्यामध्ये चंद्राबाबू नायडू राहुल गांधींसोबत दिसत आहेत.
चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशमध्ये भाजपासोबत युती करून निवडणूक लढवली होती आणि न्यूज रिपोर्टनुसार, त्यांनी निवडणुकीनंतर एनडीएसोबत राहण्याची घोषणा केली आहे.
तपासादरम्यान आम्हाला असे अनेक रिपोर्ट्स मिळाले, ज्यामध्ये चंद्राबाबू नायडू एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आल्याचा उल्लेख आहे. ANI (अर्काइव लिंक) या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, पंतप्रधानांच्या निवासस्थानी NDA पक्षांची बैठक झाली.
एजन्सीच्या रिपोर्टनुसार (अर्काइव लिंक), इतर मित्रपक्षांव्यतिरिक्त, तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनीही या बैठकीला हजेरी लावली.
म्हणजेच चंद्राबाबू नायडू एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आले होते आणि त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली नाही. व्हायरल फोटोचा मूळ स्रोत शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स इमेज सर्चची मदत घेतली. तपासादरम्यान, आम्हाला अनेक जुन्या रिपोर्टमध्ये हा फोटो आढळला, ज्याचा सध्याच्या निवडणुकांशी काहीही संबंध नाही.
८ जानेवारी २०२९ च्या 'हिंदुस्तान टाइम्स'च्या रिपोर्टमध्ये हा फोटो वापरला गेला आहे आणि दिलेल्या माहितीनुसार, नायडू यांनी काँग्रेससोबत निवडणूकपूर्व युतीबाबत राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
इतर अनेक रिपोर्टमध्ये (अर्काइव लिंक) या बैठकीचा उल्लेख करण्यात आला असून त्यांचा फोटो वापरला गेला आहे.
टीव्ही 9 या वृत्तवाहिनीचे राजकीय संपादक विश्वास न्यूजशी बोलताना आमोद राय म्हणाले की, नायडू दिल्लीत एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आले असून त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली नाही.
लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप २४० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर काँग्रेसला एकूण ९९ जागा मिळाल्या आहेत.
तर आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या एकूण २५ जागांपैकी चंद्राबाबू नायडू यांच्या पक्ष टीडीपीला १६ जागा, भाजपाला तीन आणि जेएनपीला दोन जागा मिळाल्या आहेत, तर वायएसआरसीपीला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
भ्रामक दाव्यांसह व्हायरल फोटो शेअर करणाऱ्या युजरला फेसबुकवर सुमारे दोन लाख लोक फॉलो करतात. निवडणुकांशी संबंधित इतर दिशाभूल करणाऱ्या आणि बनावट दाव्यांची चौकशी करणारे तथ्य तपासणी अहवाल विश्वास न्यूजच्या निवडणूक विभागात वाचता येतील.
निष्कर्ष
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तेलुगु देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत राहुल गांधींचा भेटीचा दावा खोटा आहे आणि त्यासोबत व्हायरल होत असलेला फोटो २०१९ चा आहे, जेव्हा नायडू यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
(सदर फॅक्ट चेक Vishvas News या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)