Ram Mandir Ayodhya: येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे अवघा देश राममय झालाय. मात्र या सोहळ्यापूर्वी अयोध्या आणि राम मंदिरासंदर्भात विविध प्रकारच्या पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत असून, त्यातील अनेक पोस्ट बनावट/खोट्या सिद्ध होत आहेत. 500 रुपयांच्या नोटेसंदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे.
काय आहे दावा? सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नोटेचा फोटो व्हायरल होतोय, ज्याबद्दल दावा केला जातोय की, नवीन सीरीजची ही नोट 22 जानेवारीला जारी होणार आहे. यामध्ये महात्मा गांधींऐवजी प्रभू रामाचा फोटो दिसत आहेत. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपद्वारे हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातोय. दरम्यान, आता या व्हायरल पोस्टचे सत्य समोर आले आहे.
काय आहे 500 रुपयांच्या नोटेचे सत्य?
दावा खोटा निघाला:प्रभू रामाचे चित्र असलेली 500 रुपयांची नोट बनावट असल्याचे समोर आले आहे. ही बनावट पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, या नोटेचा फोटो एडीट करणारा तरुण समोर आला. @raghunmurthy07 युजरनेम असलेल्या व्यक्तीने सांगितले की, हा फोटो त्याने स्वत: एडिट केला आहे. मात्र लोक चुकीचा मेसेज जोडून हा फोटो शेअर करत आहेत.
यावरुन एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, 22 जानेवारी रोजी अशी कोणतीही नवीन नोट जारी होणार नाही. ज्याने या बनावट नोटेचा फोटो एडीट केला, त्याने स्वतः समोर येऊन याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे अशाप्रकारची पोस्ट तुमच्यापर्यंत आल्यावर ती काळजीपूर्वक तपासा.