मुंबई-
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहे. पोस्टवर लाइक्स आणि शेअर्सचा पाऊस पडतोय. एखादी पोस्ट व्हायरल झाली की ती सत्य घटना असतेच असं नाही. पण ती इतकी व्हायरल होऊन जाते की असं खरंच घडलं असेल असा मानस युझर्सचा होऊन बसतो. अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यामागचं सत्य शोधण्याचा 'लोकमत'च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आणि घटनेच्या मूळाशी गेल्यावर काय समोर आलं ते जाणून घेऊयात. पण त्याआधी व्हायरल झालेली पोस्ट काय आहे ती पाहुयात...
रश्मी ठाकरेंबाबतची व्हायरल पोस्ट नेमकी काय?मुंबईच्या RTO कार्यालयात वाहनचालक परवाना नुतनीकरण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत येऊन कागदपत्रांची पडताळणी केली असा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. संबंधित पोस्ट 'शिवनेला भवन' नावाच्या एका फेसबुक पेजवरुन पोस्ट करण्यात आली असून पोस्टमध्ये रश्मी ठाकरे यांचा फोटो वापरण्यात आला आहे.
"मुंबईच्या एका RTO कार्यालयात एक महिला चालत आली, तिच्या वाहनचालक परवान्याची मुदत संपत आली होती व त्याचे नुतनीकरण करण्यासाठी.....त्या महिलेने नुतनीकरण फार्म घेतला तो व्यवस्थित भरला कागदपत्रे घेउन ती रांगेत उभी राहीली, हळुहळू क्रमांक पुढे सरकत होता, त्या महिलेची कागदपत्रे घेतली नुतनीकरण चलनाचे पैसै भरले. व सर्व प्रक्रिया आटोपून ती महीला RTO कार्यालया बाहेर पडणार तोच क्लार्क ने कागदपत्रे वाचली सौ. #रश्मी_उद्धव_ठाकरे....तो आश्र्चर्यचकित झाला, म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नी इतक्या वेळ रांगेत उभ्या होत्या.मग काय पळापळ सुरु झाली. सर्व अधिकारी पळत आले, सौ. मुख्यमंत्राना विनंती केली की त्यांनी कार्यालयात यावे. त्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण त्वरित करून देतो.सौ. मुख्यमंत्री यांनी गोड शब्दांत नकार दिला. मी फार्म भरला आहे, आणि नुतनीकरणाचे चलनही भरले आहे, आता तुमच्या नियमानुसार मला स्पिड पोस्टने परवाना पाठवा. गाडी सुरु करुन त्या निघुनदेखील गेल्या, एव्हाना अधीकार्याचे कपाळ घामाने थबथबले होते. मुख्यमंत्र्यांची पत्नी अन् RTO कार्यालयात रांगेत उभी राहते यावर विश्वास बसत नव्हता!!!!!", अशी पोस्ट 'शिवसेना भवन' नावाच्या फेसबुक पेजवरुन केली गेली आहे.
आता ''पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र'' या पेजवरचीही पोस्ट वाचाफेसबुकवर "पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र" नावानं देखील एक फेसबुक पेज आहे. या पेजवर देखील अशीच एक पोस्ट राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावानं शेअर केली गेली आहे. विशेष म्हणजे ही पोस्ट ६ फेब्रुवारी २०१९ रोजी करण्यात आली होती आणि त्याही वेळेस ही पोस्ट व्हायरल झाली होती. रश्मी ठाकरे यांच्या नावानं सध्या व्हायरल होत असलेली पोस्ट त्यावेळी अमृता फडणवीस यांच्या नावानं व्हायरल झाली होती. अमृता फडणवीसांच्या नावानं व्हायरल झालेल्या त्या पोस्टमध्ये कोणतंही तथ्य नव्हतं. यावेळी या पोस्टमध्ये फक्त अमृता फडणवीस यांच्या नावाऐवजी रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे आणि इतर सर्व मजकूर अगदी जसाच्या तसा पोस्ट करण्यात आला आहे.
उत्तर कोरियाचा हुकूमशहाच्या बहिणीच्या नावानंही पोस्ट व्हायरलपोस्टबाबत आणखी माहिती घेतली असता तिच पोस्ट उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्या बहिणीच्या नावानंही व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. किम जोंग उन याची बहिण किम यो जोंग हिनंही RTO च्या कार्यालयात वाहन परवाना नुतनीकरण करण्यासाठी सामान्य व्यक्तीप्रमाणं रांग लावून कागदपत्रांची पडताळणी करुन घेतली, अशा आशयानंही एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झालेली पाहायला मिळते.
सत्य काय?वरील तिन्ही पोस्ट आणि त्यातील साम्य लक्षात घेता तिन्ही पोस्टमधील मजकूर अगदी जशाच्या तसा कॉपी करण्यात आल्याचं स्पष्ट दिसून येतं. तसंच तिन्ही पोस्टमध्ये केल्या गेलेल्या दाव्याप्रमाणे एकाही पोस्टमध्ये रश्मी ठाकरे, अमृता फडणवीस किंवा किम यो जोंग यांचा RTO कार्यालयात रांगेत उभं असल्याचा फोटो पोस्ट करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोस्टमध्ये केला गेलेल्या दाव्याचा कोणताही सबळ पुरावा अस्तित्वात नाही. रश्मी ठाकरेंसोबतच अमृता फडणवीस नावानं व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. नागपूरच्या RTO कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी देखील 'लोकमत'नं संपर्क केला असता त्यांनीही अशाप्रकारची कोणतीही घटना गेल्या दोन वर्षात घडलेली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
याशिवाय, ज्या सोशल मीडिया पेजवरुन सदरहू पोस्ट केल्या गेल्या आहेत ते पेज अधिकृत पेज नाही. त्यामुळे मूळातच अशा पोस्टवर विश्वास ठेवता येत नाही. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांच्याशी आम्ही या पोस्ट संदर्भात संपर्क साधला. "रश्मी ठाकरेंच्या नावानं व्हायरल होणारी पोस्ट फेक पोस्ट आहे. अशीच पोस्ट २०१९ मध्ये अमृता फडणवीस यांच्या नावाने व्हायरल झाली होती", असं शीतल म्हात्रे यांनीही स्पष्ट केलं आहे.