महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षातून दोन तृतीयांशहून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे सत्तापेच निर्माण झाला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास ४२ आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. सध्या सर्व बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या सात दिवसांपासून महाराष्ट्रातील या सत्ता संघर्षामध्ये बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडत आहेत. यात महाविकास आघाडीच्या शिल्पकारांमध्ये नाव घेतले जाणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे संजय राऊत भर मुलाखतीत रडत असल्याचा एक व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल होत आहे. खणखर आणि रोखठोक भूमिकेसाठी ओळख असलेले संजय राऊत शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडामुळे खरंच रडले का? असा प्रश्न विचारला जात आहे. संजय राऊत यांच्या या व्हिडिओची सत्यता जाणून घेतली. यात नेमकं काय आढळून आलं ते सविस्तर जाणून घेऊयात..
दावा काय?शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमाला मुलाखत देत असताना संजय राऊत हमसून हमसून रडत असल्याचा दावा आशिष रघुवंशी नामक फेसबुक युझरकडून करण्यात आला आहे. त्यानं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये संजय राऊत रडत असल्याचं दिसून येतं.
कशी केली पडताळणी?गुगल सर्चमध्ये संजय राऊत यांचे सध्याचे इंटरव्ह्यू शोधण्यासाठी कि-वर्ड सर्चचा वापर केला असता राऊत यांच्या अनेक मुलाखती आपल्याला दिसून येतात. यात व्हायरल करण्यात आलेल्या दाव्यातील व्हिडिओची फ्रेम जुळणारी 'आजतक' वृत्त समूहानं घेतलेली मुलाखत सापडली. 'आजतक'नं घेतलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ येथे पाहता येईल.
त्यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओतील काही स्क्रिनशॉट घेतले आणि ते 'आजतक'च्या व्हिडिओशी जुळवून पाहिले. यात संजय राऊत यांच्या व्हिडिओसोबत छेडछाड करण्यात आल्याचं दिसून आलं. व्हायरल झालेला व्हिडिओ सोशल मीडिया ॲप्सचा वापर करुन संजय राऊतांचे हावभाव ते रडत आहेत असं वाटेल असं एडिट करण्यात आले आहेत. मुख्य व्हिडिओमधील संजय राऊतांचे हावभाव आणि एडिट करण्यात आलेले हावभाव याची काही उदाहरणं पुढीलप्रमाणे...
गुगलवर असे काही फिल्टर वापरण्यासाठी कोणते ॲप्स आहेत का? याबाबत सर्च केलं असता इन्स्टंट मेसेजिंक ॲप Snapchat वर Cry Filter असल्याचं दिसून आलं. त्यामुळे राऊत यांच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची छेडछाड करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे.
निष्कर्ष: संजय राऊत रडत असल्याचा व्हायरल व्हिडिओ खोटा असल्याचं निष्पन्न झालं आहे.