नवी दिल्ली : केंद्र सरकार बेरोजगार तरुणांना सहा हजार रुपयांचा बेरोजगारी भत्ता देत असल्याचा एक व्हॉट्सॲप संदेश सध्या व्हायरल झाला असून, हा भत्ता मिळविण्यासाठी काय करावे, याची विचारणा तरुणांकडून केली जात आहे. तथापि, हा संदेश पूर्णत: बनावट असल्याचे ‘फॅक्ट चेक’मध्ये स्पष्ट झाले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारांकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सबसिडीसह थेट लाभाच्या योजनांचाही त्यात समावेश आहे. त्याच धर्तीवर केंद्र सरकार बेरोजगारांना दरमहा सहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य करीत असल्याचा एक व्हॉट्सॲप संदेश व्हायरल झाला आहे. पंतप्रधान बेरोजगारी भत्ता योजनेंतर्गत हे अर्थसाहाय्य दिले जात असल्याचे संदेशात म्हटले आहे. अन्य योजनांप्रमाणे हीसुद्धा एखादी थेट लाभ योजना असेल, असे गृहीत धरून तरुण या संदेशाची माहिती घेताना दिसून येत आहेत.
तो तर बनावट मेसेजपीआयबीने या व्हॉट्सॲप संदेशाचे ‘फॅक्ट चेक’ केली तेव्हा हा संदेश पूर्णत: बनावट असल्याचे आढळून आले. हा संदेश खोटा असल्याचे ट्वीट पीआयबीने केले आहे. पीआयबीने म्हटले की, पंतप्रधान बेरोजगारी भत्ता योजनेचा संदेश बनावट आहे, अशी कोणतीही योजना भारत सरकार राबवीत नाही. कृपया हा संदेश कोणीही फॉरवर्ड करू नये.