Created By: आज तक
Translated By: ऑनलाइन लोकमत
Fact Check: यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणी वाढत आहेत. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये त्याने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. केवळ तोच नाही तर समय रैना, इन्फ्लुएंसर अपूर्व माखिजा आणि इतर अनेकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सगळा वाद सुरु असतानाच रणवीर अलाहाबादियाचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो रडताना म्हणत आहे की, याच्यामुळे संपूर्ण काम बंद पडल्याचा पश्चाताप होत आहे. व्हिडीओमध्ये पुढे तो म्हणतो की याचे परिणाम संपूर्ण टीमला भोगावे लागत आहेत. व्हिडिओमध्ये तो शिवीगाळही करत आहे.
व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजर्सचा दावा आहे की, हा अलाहाबादियाचा व्हिडिओ आहे जो त्यान वादात सापडल्यानंतर बनवला आहे. व्हिडिओ शेअर करताना लोक कॅप्शनमध्ये, “मला वाईट वाटत आहे कारण माझ्यामुळे सर्व काम थांबले आहे.. हॅलो @BeerBicepsGuy उर्फ रणवीर अलाहाबादी… काम थांबले आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटायला नाही पाहिजे. तुम्हाला यासाठी वाईट वाटले पाहिजे कारण तुम्ही ज्या आईने तुम्हाला जन्म दिला त्या आईच्या पलंगाबद्दल बोललास”. असाच दावा करत हा व्हिडिओ फेसबुकवरही शेअर केला जात आहे.
आज तक फॅक्ट चेकनुसार रणवीर अलाहाबादियाचा हा व्हिडिओ २०२१ चा आहे जेव्हा त्याला कोविडची लागण झाली होती.
सत्य कसं समोर आलं?
कीवर्ड सर्चच्या मदतीने रणवीर अलाहाबादियाच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ सापडला जो ७ एप्रिल २०२१ रोजी अपलोड करण्यात आला होता. व्हिडिओचे टायटल आहे, ““This Is NOT Clickbait - My Covid-19 Experience | Vlog 24”. या व्हिडिओमध्ये, व्हायरल व्हिडिओचा भाग ३० सेकंदांनंतर पाहता येतो.
व्हिडीओमध्ये अलाहाबादिया म्हणत आहे की त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि आता त्याला १४ दिवस घरात कोंडून राहावे लागणार आहे त्यामुळे त्याचे काम थांबले आहे. या आठ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्यांची टीम अलाहाबादियाशिवाय कोविड काळात कसे काम करत आहे हे देखील सांगत आहे.
त्यामुळे स्पष्ट होतं की व्हायरल व्हिडिओ जवळपास चार वर्षे जुना आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये नुकत्याच झालेल्या वादाशी याचा काहीही संबंध नाही. मात्र, हा वाद वाढल्यानंतर अलाहाबादियाने एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.
(सदर फॅक्ट चेक आज तक या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)