७० टक्के आयआयटी-बी विद्यार्थ्यांना रोजच्या अंघोळीचा कंटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2016 11:39 AM
दहा पैकी सहा ‘आयआयटी-बी’चे विद्यार्थी दर दोन-तीन दिवसांनी अंघोळ करणे पसंत करतात. दहा टक्के विद्यार्थी तर आठवड्यातून एकदाच अंघोळ करतात.
देशातील सर्वात प्रतिष्ठित ‘आयआयटी-मुंबई’ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रोज अंघोळ करण्याचा भलताच कंटाळा आहे. विद्यार्थ्यांतर्फेच घेण्यात येणाºया वार्षिक सर्वेक्षणनसुार दहा पैकी सहा ‘आयआयटी-बी’चे विद्यार्थी दर दोन-तीन दिवसांनी अंघोळ करणे पसंत करतात. दहा टक्के विद्यार्थी तर आठवड्यातून एकदाच अंघोळ करतात. संपूर्ण होस्टेलमधून केवळ ३० टक्के विद्यार्थीच रोजच्या रोज अंघोळ करतात.एकूण ३३२ विद्यार्थ्यांचा सामावेश असेलेल्या या सर्व्हेतून इतरही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. कॉलेजनंतर ४० टक्के विद्यार्थी मित्रांसोबत राहण्याला प्राधान्य देतात तर २७ टक्के परत घरी जाणार व १९ टक्के एकटे राहणार आहेत. ५२.४ टक्के विद्यार्थ्यांचे मित्रांसोबत गोवा रोडट्रीप करण्याचे स्वप्न आहे. लग्नाविषयीसुद्धा या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आले होते. कॉलेजमधून पास आऊट झाल्यावर किमान पाच वर्षे तरी लग्न करणार नसल्याचे ३९.१५ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. ३१ टक्क्यांनी याचा विचार केला नसल्याचे मान्य केले तर २१.४ टक्के विद्यार्थ्यांना तीन ते पाच वर्षांत लग्नबंधनात अडकण्याची इच्छा आहे.विशेष म्हणजे आयआयटी-बीमध्ये शिकणारे ३९ टक्के स्वत:ला धार्मिक, २१ टक्के आस्तिक तर ३९ टक्के विद्यार्थी स्वत:ला अज्ञेयवादी मानतात. ५५.७ टक्के विद्यार्थ्यांनी जेम्स बॉण्ड सिनेमा ‘कसिनो रोयाल’पाहून पोकर/ब्लॅकजॅक खेळायला सुरूवात केल्याचे सांगितले.