लंडन : वैविध्यपूर्ण भारतीय साड्यांनी युरोप, अमेरिकेसहित बहुतांश देशांतील महिलांना भुरळ घातली आहे. त्यामुळे लंडन येथे १९ मेपासून होणाऱ्या ‘दी ऑफ बीट साडी’ या फॅशन शोमध्ये ९० प्रकारच्या साड्या परिधान करून मॉडेल रॅम्प वॉक करणार आहेत. साड्यांसंदर्भातील अशा प्रकारचा हा ब्रिटनमधील पहिलाच भव्य फॅशन शो असून त्याचे आयोजन डिझाईन म्युझियमने केले आहे. जगभरातील अनेक डिझायनर या फॅशन शोमध्ये सहभागी होणार असून त्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या साड्या सादर होणार आहेत.
हायब्रिड साड्यांची वाढती लोकप्रियता
सध्या हायब्रिड साड्यांची फॅशन आहे. एका डिझायनरने तयार केलेली साडी ब्लाऊजच्या ऐवजी शर्ट घालूनही परिधान केली जाऊ शकते. अशा विविध प्रकारच्या संकल्पना लढवून भारतीय साडीला विविध रुपात सादर करण्याचे प्रयत्न फॅशन शोमधून होत आहेत.
साडी बनली फॅशन आयकॉन
- डिझायनर साड्यांपासून विविध प्रकारचे ड्रेस बनविले जात आहेत. साडी गाऊनपासून ते रेडी टू वेअर साडीपर्यंत सारे प्रकार बाजारपेठेत उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर साडी तयार करताना कधी स्टीलच्या धाग्यांचा वापर केला जातो.
- वस्त्रांमधील साडी हा प्रकार शेकडो वर्षे प्राचीन आहे. सध्याच्या काळात साडीच्या निर्मितीत खूप प्रयोग होत आहेत. भारतीय साडी ही आता फॅशन आयकॉन बनली आहे.
कोणत्या साड्या पाहायला मिळणार?
- लेडी गागाने २०१० साली परिधान केलेली साडी, तरुण तहलियानी, अबु जानी, संदीप खोसला यांनी तयार केलेल्या व जाळीचे नक्षीकाम असलेल्या साड्या दी ऑफ बीट साडी या शोमध्ये पाहायला मिळतील.
- त्यातील एक साडी २०२२ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केली होती.