ट्विटरवरील अपशब्द प्रकरणी अभिजीतवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2016 9:35 AM
ट्विटरवर अपशब्द वापरल्याप्रकरणी गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्यावर ‘आप’च्या नेत्या प्रीति मेनन यांनी केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ट्विटरवर अपशब्द वापरल्याप्रकरणी गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्यावर ‘आप’च्या नेत्या प्रीति मेनन यांनी केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी गायक अभिजीतला चौकशीला सामोरे जावे लागेल.पत्रकार स्वाती चतुवेर्दी आणि जनताकारिपोर्टर.कॉमच्या मुख्य संपादक रिफात जावेद यांना अभिजीत यांनी आक्षेपार्ह ट्वीट केले. चेन्नईतील इंजिनिअर तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपी मुस्लिम असल्याचा दावा करत अभिजीत यांनी ट्वीट केले होते. प्रत्यक्षात संशयित आरोपी मुस्लिम नसल्याचे समजते. अभिजीत धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा-सुव्यवस्थेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ट्वीट स्वाती चतुवेर्दी यांनी केलं. यामध्ये मुंबई पोलिसांना मेन्शन करुन अभिजीत विरोधात कारवाईची मागणीही त्यांनी केली.याचा राग येऊन संतापलेल्या अभिजीत यांनी ‘निर्लज्ज म्हातारे’ अशा शब्दात स्वातींवर संताप व्यक्त केला. तू पाकिस्तानींचे पंजे चाटत असल्याचं म्हणत अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केली. जनताकारिपोर्टर.कॉमच्या मुख्य संपादक रिफात जावेद यांनी या वादात उडी घेत ‘किती संस्कारी आहात’ असा खोचक टोला मारला. यावरही अभिजीतने ‘हो आम्ही भारतीय पाकिस्तानींना लाथ मारतो, हेच आमचे संस्कार आहेत’ असं प्रत्युत्तर दिलं.मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवण्यास सांगितलं. त्याचप्रमाणे जवळच्या पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्लाही दिला.