- दाजी कोळेकरभारतीय संस्कृती विविधतेने नटलेली असून ती अनेक वैशिष्ट्ये, समस्या, गुणदोष आदींनी भरलेली आहे. याच वैविध्यपूर्ण संस्कृतीवर अलीकडच्या काळात दळणवळणाच्या वाढत्या साधनांद्वारे आक्रमण होत आहे; पण ही संस्कृती नेमकी आहे तरी कशी, कशी बदलतेय आणि तिचे महत्त्व व गरज याचा मागील २५ वर्षांपासून सचित्र शोध घेणारे ठाण्यातील एक हौशी फोटोग्राफर सुनील जोशी यांनी केलेल्या अभ्यासाविषयी. हहजारो शहरे आणि लाखो खेड्यांनी मिळून भारताचे शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग पडतात. ठाण्यासारख्या शहरी जीवनामध्ये लहानाचे मोठे झालेले सुनील जोशी यांना पूर्वीपासून ट्रेकिंगची मोठी आवड. त्यामुळे त्यांचा डोंगर, दऱ्या-खोऱ्यातील आदिवासी व भटक्या मेंढपाळांचे लोकजीवन जवळून पाहायला मिळायचे. ट्रेकिंग करता करता त्यांना आदिवासी व मेंढपाळ लोकांचे जीवन कसे असते, याविषयी मनामध्ये कुतूहल निर्माण झाले आणि त्यांनी तळागाळात म्हणजे खेड्यात आदिवासी पाड्यावर आणि मेंढपाळांच्या वाड्यावर जाऊन त्यांचे जीवन आपण जगण्याचा प्रयत्न करत त्यांच्या जगण्याचा म्हणजे संस्कृतीचा अभ्यास करायचे ठरविले. माळशेज घाटातील पांगूळ गव्हाणपाड्यावरील आजीकडे एक मुक्काम करून तिच्या दैनंदिन जगण्याचे विविध पैलू पाहत आदिवासी मेनू काय असतो, याचा अभ्यास केला. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील साकूरमधील मेंढपाळाच्या वाड्यावर जवळपास एक महिना मुक्काम करून त्यांची दैनंदिनी काय असते याचा जवळून अनुभव घेत स्वत: त्यांचे जीवन जगण्याचा प्रयत्न केला. किलोमीटरचा विचार न करता दिवसभर मेंढ्यामागे फिरणे आणि मागील २० वर्षांत संध्याकाळी कधीही झोप न लागलेले, पडल्या पडल्या क्षणात गाढ झोपी गेल्याचे अनुभव जोशी यांनी घेतला.‘मेंढी ते घोंगडी’ डॉक्युमेंटरीचा उदयसध्या विदेशी ब्लँकेट्सच्या जमान्यात आपल्याकडील लोकरीचे, घोंगडी व कपडे दुर्मीळ होत असल्याचे दिसत आहे. तसेच अलीकडे मेंढपाळ व्यवसायही कमी होत चालल्यामुळे लोकरीचे कपडे मिळणे दुरापास्त होत आहे. भविष्यातील पिढीत लोकर कुठे असते आणि घोंगडे कसे तयार होते याचा विसर पडू नये म्हणून सुनील जोशी यांनी एक ‘मेंढी ते घोंगडी’ अशी प्रवासमय एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे. त्यातून त्यांनी मेंढपाळ व लोकरीचे उत्पादन आणि त्यातून मिळणारे उत्पादन याचे अर्थकारण मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रामीण संस्कृतीशी दोस्ती करणारा हौशी छायाचित्रकार
By admin | Published: July 13, 2017 2:23 AM