...आणि मॅन बुकर प्राईजचे काउंट-डाऊन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2016 5:34 PM
‘मॅन बुकर प्राईज 2016’ या पुरस्कारासाठी पात्र अंतिम १३ पुस्तकांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
दरवर्षी सर्वोत्तम इंग्रजी कादंबरीसाठी दिल्या जाणाऱ्या ‘मॅन बुकर प्राईज’ या पुरस्कारासाठी पात्र अंतिम १३ पुस्तकांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये द. आफ्रिकेचे जे. एम. कोएट्झी आणि अमेरिकतील पुलित्झर विजेत्या एलिझाबेथ स्ट्राऊट यासारख्या प्रसिद्ध लेखकांचा सामावेश आहे.कोएट्झी यांची ‘द स्कूलडेज् आॅफ जीझस्’ आणि स्ट्रॉऊट यांची ‘माय नेम इज लुसी बार्टन’ कादंबरी यंदा स्पर्धेत आहे. यावेळी इयान मॅकइव्हान, डॉन डीलिलो हेदेखील काही नवख्या आणि उभारत्या लेखकांशी स्पर्धा करणार आहेत. आॅस्ट्रेलियामध्ये स्थायिक असलेले कोएट्झी यांना सट्टेबाजांची पहिली पसंती आहे. असे झाले तर त्यांना तीनदा मॅन बुकर प्राईज जिंकणारा पहिला लेखक होण्याचा बहुमान मिळेल. याआधी १९८३ मध्ये ‘लाईफ अँड टाईम्स आॅफ मायकल के’ आणि १९९९ साली ‘डिसग्रेस’ कादंबरीसाठी त्यांना बुकर मिळालेला आहे.२००९ साली ‘आॅलिव्ह किटरिज’साठी स्ट्राऊट यांना ‘पुलित्झर प्राईज’ मिळाले होते. याच नावाने या कादंबरीवर टीव्ही मिनीसीरिजदेखील बनवण्यात आली आहे, ज्यामध्ये फ्रान्सिस मॅकडॉरमँडची प्रमुख भूमिका आहे. जे. एम. कोएट्झी आणि एलिझाबेथ स्ट्राऊटअंतिम तेरा पुस्तकांच्या यादीमध्ये यावर्षी डेव्हिड मीन्स (हिस्टोपिया), वायल मेम्युईर (द मेनी), ओटेस्सा मॉशफे (ईलिन) आणि वर्जिनिया रीव्हज् (वर्क लाईफ एनी अदर) या चार नवलेखकांचा सामावेश आहे. २५ आॅक्टोबर रोजी विजेत्याची घोषणा करण्यात येणार असून लेखकाला ५० हजार पाऊंडची (सुमारे ४४ लाख रु.) रक्क्म देण्यात येते.