विदेशी कुत्र्यांच्या आयातीवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2016 2:35 PM
सरकारने व्यावसायिक हेतूसाठी विदेशातून कुत्रे आयात करण्यावर बंदी घातली आहे.
अनेक लोकांना कुत्रे पाळण्याची आवड असते. त्यातल्या त्यात विदेशी कुत्र्यांना भारतात खूप मागणी आहे. तुम्हीदेखील जर विदेशातून एखादा क्युटसा डॉगी मागविण्याचा विचार करत असाल तर तसे होणे नाही. कारण सरकारने व्यावसायिक हेतूसाठी विदेशातून कुत्रे आयात करण्यावर बंदी घातली आहे.विदेशी व्यापार महासंचालकांनी काढलेल्या आदेशानुसार रक्षा, पोलिस, संशोधन व विकास (आर अँड डी) या कारणांव्यतिरिक्त कोणीही विदेशातून कुत्रा मागवू शकत नाही. प्राण्यांच्या हक्कांविषयी लढणाऱ्या अनेक एनजीओंनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.पिपल फॉर अॅनिमल या संस्थेच्या विश्वस्त गौरी मौलेखी म्हणाल्या की, सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे हजारो कुत्र्यांना होणारा त्रास कमी होईल. आमच्या शेल्टर होममध्ये असे विदेशी प्रजातींचे हजारो कुत्रे आहेत जे मालकांनी रस्त्यांवर सोडून दिले कारण त्यांना या विदेशाी कुत्र्यांची काळजी कशी घ्यायची याची पुरेशी माहिती नसते.विदेशी प्रजातींमध्ये भारतात जर्मन शेफर्ड, रॉटवेईलर, लॅब्रॉडॉर, डॉबरमॅन आणि पग यांनी सर्वाधिक मागणी आहे. वीस हजार रुपयांपासून पुढेच त्यांची किंमत सुरू होते. ज्या लोकांना विदेशातून कुत्रा पाहिजे असेल त्यांना आवश्यक सर्व कागदपत्रे आणि वैध पेटबुक सादर करावे लागतील.