- माधुरी पेठकरकेळ आरोग्यासाठी लाफदायक फळ आहे. आरोग्य चांगल राहावं म्हणून रोज एक केळ खाण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. केळ खाऊन झाल्यावर आपण काय करतो? असा प्रश्न तुम्हाला मुर्खासारखा वाटू शकतो. पण खरोखर केळ खाऊन झाल्यानंतर तुम्ही काय करता? उत्तर सोपं आहे फेकून देतो केराच्या टोपल्यात. तसंही आणखी दुसरं काय करणार केळांच्या सालीचं. लहान असताना केळ खाऊन केळाचं साल रस्त्यात टाकायला मजा यायची. येता जाता कोणी त्यावरून सटकून पडलं की जाम हसायला यायचं. पण मोठ्यांनी सल्ला देवून देवून ही दुसर्याना इजा करणारी सवय मोडीत काढली. तेव्हापासून केळ खाल्ल्यावर केळाची साल बरोबर केराच्या टोपलीतच जायला लागली.पण आता ब्युटी एक्सपर्टस सांगता आहेत की केळाची सालं कचर्याच्या डब्यात न टाकता चेहेर्याला लावा. हे आणखी काय नवीन?केळामध्ये जेवढी सत्त्वं असतात तितकेच गुण केळांच्या सालीत असतात. त्वचेची निगा राखण्यात केळीची सालं खूप मदत करतात. त्यासाठी एकच करायचं केळ खाल्लं की केळाचं साल चेहेर्याला लावायचं.
केळीच्या सालीचे फायदे.1) त्वचेचा पोत सुधारतो.
त्वचेचा पोत सुधारण्यासाठी केळीचे साल फायदेशीर ठरते. यासाठी केळीच्या सालीचा आतला भाग चेहेर्यावर घासावा. घासल्यानंतर चेहेरा तसाच अर्धा तास सुकू द्यावा. नंतर अर्ध्या तासानं चेहेरा गरम पाण्यानं धुवून घ्यावा. केळीच्या सालीत अॅण्टिआॅक्सिडंटस असतात त्यामुळे त्वचा सैल न पडता घट्ट आणि बांधीव राहाते.
2) डाग आणि व्रण जातात.
चेहेर्यावर ज्याठिकाणी डाग असतात त्या जागी केळीच्या सालीचा थोडा भाग घेवून घासावा. घासताना केळीच्या सालीवरचे तंतू चेहेर्याला चिटकतात. अर्ध्या तासानं गरम पाण्यात रूमाल बुडवून घट्ट पिळून त्यानं चेहेरा पुसावा. या उपायाचा त्वरित परिणाम हवा असल्यास हा उपाय दिवसातून दोनदा करावा. त्वचेची आग होत असल्यास केळीच्या सालीचा फायदा होतो.
3) डोळ्याखालचा काळेपणा आणि सूज घालवण्यासाठीकेळीच्या सालीचा उपयोग डोळ्याखालचा काळेपणा घालवण्यासाठी तसेच डोळ्याखालची सूज घालवण्यासाठीही करता येतो. एक चमचा घेवून केळीच्या सालीवरचे पांढरे तंतू खरडून काढावेत. त्यात कोरफडीचा गर मिसळावा. हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. आणि ते डोळ्याखाली लावावं. केळीच्या सालीत पोटॅशिअम असतं ते आणि कोरफड गरातील मॉश्चरायझर या दोन्हीचा उपयोग डोळ्याखालचा काळेपणा आणि सूज घालवण्यासाठी करता येतो.