पुणे : दिवाळी म्हटली की आठवतो तो फराळाचा दरवळणारा सुगंध, उटण्याची अंघोळ, सजलेले अंगण आणि नवे कोरे कपडे. प्रत्येक दिवाळी बाजारात नवी फॅशन घेऊन येत असते. त्या वर्षी आलेल्या सिनेमातली किंवा एखाद्या मालिकेशी निगडित फॅशन त्या वर्षीचा फॅशन ट्रेंडसेटर असते. यंदाच्या दिवाळीत बाजारात बनारसी दुपट्टे हिट असून मुली, महिला आवर्जून या दुपट्ट्यांची खरेदी करताना दिसत आहेत.
मुळात बनारसी साड्या किंवा शालू आपल्याकडे पूर्वापार नेसले जातात.विशेषतः जरदोसी आणि टिकली आणि स्टोनवर्कची फॅशन येण्यापूर्वी वेलबुट्टी असलेला बनारसी शालूचं नवरी मुलीने नेसायचा असतो असा जणू अलिखित नियमच झाला होता. त्यातही लाल, मरून, जांभळा, राणी कलर (मॅजेंटा) जास्त वापरले जायचे. पुढे वजनाने जड असलेल्या घागरा आणि साड्यांची फॅशन आली आणि बनारसीचा ट्रेंड जरा मागे पडला.आता मात्र बनारसी पुन्हा नव्या जोमाने बाजारात आला असून साड्यांपेक्षा ओढण्या अर्थात दुपट्टा अधिक पसंत केल्या जात आहेत.
यासाठी करा बनारसी ओढणीची निवड
- भरपूर रंग. विशेषतः उत्सवात वापरले जाणारे गडद रंग यात उपलब्ध आहेत. विशेष लाल, निळी, हिरवी या तीन रंगांचे दुपट्टा अंगावर प्रचंड खुलतात.
- एक डार्क रंगाची ओढणी अनेक ड्रेसवर वापरता येऊ शकते. त्यामुळे दोन वेगवेगळ्या ड्रेसवर तुम्ही एकच ओढणी वापरू शकता.
- अगदी घरातल्या कार्यक्रमापासून बाहेरच्या सर्व कार्यक्रमात तुम्ही बनारसी दुपट्टा वापरू शकता.हा दुपट्टा लवकर चुरगळत नसल्याने दोन तास प्रवास करायचा असेल तरी वापरायला हरकत नाही.
- ही ओढणी मुळात भरलेली असल्यामुळे संबंधित ड्रेसवर फार दागिने घालण्याची गरज पडत नाही.
- बनारसी ओढणी साधारण ३५० रुपयांपासून ते २५००पर्यंत उपलब्ध आहेत. मात्र साधारण ५०० ते ७०० रुपयांच्या रेंजमध्ये सिल्कसारख्या आणि टिकाऊ ओढण्या तुमच्या जवळच्या लोकल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.तेव्हा यंदाच्या दिवाळीत एक तरी बनारसी ओढणी घ्यायला विसरू नका.