ख्रिसमस सिझन : गिफ्ट दिल्याने वाढते प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2016 5:59 PM
या फेस्टिव्ह सीझनमध्ये आपल्या जवळच्या लोकांना घरी बनवलेल्या भेटवस्तू देऊन करा खुश. गिफ्ट देणे म्हणजे नेमके काय? जाणून घ्या काय असतो भेटवस्तू देण्याचा अर्थ.
नवीन वर्षाचे स्वागत असो किंवा नाताळाचे उत्सवी वातावरण, आपल्या प्रियजणांना गिफ्ट देण्याचा हा सर्वोत्तम काळ असतो. गिफ्ट दिल्याने प्रेम वाढते, नात्यातील गोडवा वाढतो.गिफ्ट स्वीकारायला कोणाला आवडत नाही. मस्त चकचकीत, रंगबेरंगी रॅपर पेपरमध्ये गुंडाळलेल्या बॉक्समध्ये काय असेल ही उत्सुकताच किती भन्नाट असते. कोणी सांगत असेल किंवा नसेल, पण किमान वाढदिवसाला तरी लोक गिफ्टची अपेक्षा करत असतात. काही स्पेशल आॅकेजन असेल तरच गिफ्ट देण्याचा काळा केव्हाच संपून गेला, आजकाल तर दिवसागणिक चार कारणं तरी मिळतील गिफ्ट देण्यासाठी. पण गिफ्ट देणं म्हणजे काय असते? ते द्यावं की नाही? बरं द्यावं तर केवळ फॉरमॅलिटी म्हणून द्यावं की, त्याने दिलं होतं तर मला पणा द्यावं लागेल असं परतफेड करण्यासाठी द्यावं?एखादा आनंदाचा क्षण, तो प्रसंग अधोरेखित करण्यासाठी गिफ्ट किंवा भेटवस्तू देत असतात. त्या क्षणाची आठवण म्हणून भेटवस्तू द्यायची असते. ती केवळ वस्तूंची देवाणघेवाण नाही. समोरच्या व्यक्तीबद्दल आपण काय विचार करतो, आपल्यालेखी त्याचे किती महत्त्व आहे, याचे प्रतीक म्हणजे गिफ्ट. आपलं प्रेम, जिव्हाळा, काळजी, शुभेच्छा अशा सगळ्या भावनांचा तो गुच्छ असतो. बरं गिफ्ट देणं ही सुद्धा एक कला असते. दुकानात गेलो आणि चार पैसे देऊन काही तरी वस्तू घेऊन येण्याला काही अर्थ नाही. मग ती वस्तू कितीही महागडी असो. प्रसंग, समोरचा व्यक्ती आणि त्याच्याशी असलेलं तुमचं नातं ह्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून भेटवस्तू द्यायची असते. समोरचा माणूस आपल्यासाठी किती स्पेशल आहे हे त्यातून दिसले पाहिजे. त्याच्या आणि आपल्या व्यक्तीत्वाची झलक त्या गिफ्टमध्ये असावी. एकूण काय तर खऱ्या भावना असाव्यात.मग त्या भावना दुकानात कशा विकत मिळतील? म्हणून तर सध्या ‘होममेड गिफ्ट’ची क्रेझ वाढली आहे. नुसती वाढलीच नाही तर त्याचा दिवससुद्धा आहे. ‘होममेड गिफ्ट’ म्हणजे घरी बनवलेली भेटवस्तू. कोणालाही गिफ्ट द्यायचे असेल तर ते वेळ देऊन, थोडं डोकं चालवून, क्रिएटिव्हीटीची चक्रे फिरवून तयार करायचे. कॉर्पोरेट जगतात म्हणतात ना ‘ट्रुली पर्सनलाईज्ड’, अगदी तसंच.असं घरी बनवलेलं गिफ्ट ना एकदम युनिक , एकदम स्पेशल वाटते. त्यातून आपल्या खऱ्या भावना दिसून येतात. मग ते त्या व्यक्तीचा आवडणारा खाद्यपदार्थ असू द्या की, तुम्ही स्वत: शिवलेले स्वेटर, घरी बनवलेली कोणतीही वस्तू हटके गिफ्ट ठरते. अगदी कोणीही घरी गिफ्ट तयार करून देऊ शकते. उलट समोरच्यासाठी तो स्पेशल अनुभव असतो. आपल्यासाठी कोणीतरी एवढी मेहनत घेतली ही भावना त्यांना सुखावते. तशी आत्मीयता दुकानातील फॅन्सी गिफ्टला नाही.