- मोहिनी घारपुरे-देशमुखनथ म्हणजे नाकात वाकडा आकडा असं जरी नथीच्या बाबतीत म्हटलं जात असलं तरीही फॅशनच्या जगातली नथ यापेक्षा वेगळी आहे. वाकड्या आकाराला मागे सारून त्याऐवजी नथीचा अर्धचंद्राकृती आकार कधी लोकप्रिय झाला हे लक्षात देखील आलं नाही. पूर्वी पाणीदार मोत्यांची आणि काहीशी मोठ्या आकाराची नथ अनेक स्त्रिया हौसेनं, आवडीनं घालत असत. नऊवारी पातळावर नथ पाहिजेच पाहिजे असंच समीकरण होतं. आताच्या मुलींना कुठे नथ आवडणार असं वाटत असतानाच तिकडे बाजारात तरूणींना भुरळ घालणाऱ्या, मोहात पाडणाऱ्या अनेक नथी आल्या. त्यांच्या हटक्या रूपामुळे या नथी तरूणींच्या फॅशनमध्ये कधी इन झाल्या ते लक्षात देखील आलं नाही. अलिकडे बाजारात हिऱ्याच्या, खड्याच्या, मोत्याच्या, चापच्या आणि अन्य अनेक प्रकारच्या नथी उपलब्ध आहेत. परंतु त्यातही जय मल्हार फेम बाणाईच्या नाकातली अर्धचंद्राकृती आकाराची नथ तुफान लोकप्रिय झाली आहे. बाणाई अर्थात बानू ही एका विशिष्ट समाजाचं प्रतिनिधीत्त्व करणारी त्यामुळे तिची आभुषणंही त्याच प्रकारची. असं असलं तरीही तिच्या नाकातली नथ मात्र बघता बघता फॅशनच्या जगात हिट झाली. अनेक युवती याच प्रकारच्या नथीची मागणी करताना अलिकडे दिसतात. विशेषत: लग्नसमारंभात पारंपरिक पोषाखावरही ही नथ घालून अनेकजणी मिरवताना दिसतात.मोत्यांच्या असलेल्या या बाणाई नथीत हिरव्या आणि राणी रंगाचे खडे, अमेरिकन डायमंड असतत. अतिशय सुबक आकारात असलेली ही नथ फॅशनेबल तरूणींनाही घालावीशी वाटते. बाणाईची नथ घालायची असेल तर नऊवारीच नेसायला हवी असंही काही नाही. खणाची एम्ब्रॉयडरी असलेला पंजाबी ड्रेस, कुर्ती आणि धोती स्टाईल पायजमा यावरही ही नथ फॅशनेबल आणि मॉडर्न दिसते.