अणुबॉम्ब स्फोटाखाली उभे राहण्याची यांनी केली होती डेअरिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2016 2:29 PM
अणुबॉम्ब विस्फोटाचा मानवावर कसा परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी पाच लोकांनी स्वत:हून पुढाकार घेत विस्फोट बिंदूच्या ठीक खाली उभे राहण्याचे मान्य केले.
दुसºया महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात अमेरिकेला सोव्हिएत रशिया आपल्यावर अणुहल्ला करणार याची अनाहुत भीती वाटायची. या भीती पोटी अमेरिकेने पन्नास आणि साठच्या दशकात अनेक प्रोजेक्ट हाती घेतले होते. जर समजा सोव्हिएत रशियाने हल्ला केलाच तर तो हाणून पाडण्यासाठी अमेरिकेन जिनी रॉकेटची निर्मिती केली होती.१७०० टन टीएनटी विस्फोटकांच्या शक्तीसम १.७ किलोटनचे अणुबॉम्ब या रॉकेटस्मध्ये होते. परंतु केवळ चाचणी करिता एकदाच त्यांचा वापर झाला. जुलै १९, १९५७ रोजी म्हणजेच ५९ वर्षांपूर्वी ‘जॉन’ या संकेतनामाने ही चाचणी करण्यात आली. नेवाडा चाचणी स्थळ ‘एरिया १०’ वर नॉरथ्रॉप एफ-८९ स्कॉर्पियन जेटद्वारे १८.५ फूट उंचीवरून हे रॉकेट लाँच करण्यात आले. सुमारे ४ किमी अंतर पार केल्यावर हवेतच जमिनीपासून ५.६ किमी उंचीवर त्याचा स्फोट करण्यात आला.यामध्ये सर्वात आश्चर्य वाटण्याची गोष्ट म्हणजे विस्फोटाचा मानवावर कसा परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी पाच लोकांनी स्वत:हून पुढाकार घेत विस्फोट बिंदूच्या ठीक खाली उभे राहण्याचे मान्य केले. हे पाच लोक म्हणजे कर्नल सिडनी ब्रुस, लेफ्ट. कर्नल फ्रँक पी. बॉल, मेजर नॉर्मन बॉडिंजर, मेजर जॉन ह्युज् आणि डॉन लुट्रेल.त्यावेळच्या विज्ञानानसुार या लोकांना गंभीर अशी हानी पोहचणार नाही असे गृहीत धरण्यात आले. परंतु आज आपल्याला माहित असलेले किरणोत्सर्गाचे दूष्परिणाम त्याकाळी माहित नव्हते. या पाचही जणांना वयाच्या चाळीशी किंवा पन्नाशीत कर्करोगाने ग्रासले. ब्रुस, बॉल, बॉडिंजर आणि ह्युज् या सगळ्यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. लुट्रेलला मोठ्या आतड्याचा कॅन्सर झाला.सहभागी झालेल्या सर्वांनाच कॅन्सर होणे याला काही योगायोग म्हणता येणार नाही. पाचपैकी बरेच जण अनेक अणुचाचण्यांमध्ये सहभागी झालेले होते. ‘पार्शियल न्युक्लियर टेस्ट बॅन ट्रिटी’द्वारे १९६३ पासून हवेत अणुचाचण्या करण्यावर बंदी घालण्यात आली.