फेसबुकचा मेसेज होणार आपोअप डिलिट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2016 2:22 PM
‘सेल्फ डिस्ट्रक्ट’ फीचरद्वारे तुम्ही किती वेळानंतर मेसेज डिलिट व्हायला पाहिजे ते ठरवू शकता.
बदलत्या काळानुसार सुविधांमध्ये अमुलाग्र बदल करत फेसबुकने आता एक नवीन फीचर आपल्या युजर्ससाठी आणले आहे. तुम्हाला जर वाटत असेल की, एखादा मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचल्यानंतर आपोआप काही वेळाने डिलिट व्हायला हवा, तर आता असे करणे शक्य होणार आहे. फेसबुकने ‘सेल्फ डिस्ट्रक्ट’ फीचर उपलब्ध करून दिले आहे.त्याद्वारे तुम्ही किती वेळानंतर मेसेज डिलिट व्हायला पाहिजे ते ठरवू शकता. थोडक्यात काय तर सध्या प्रचंड लोकप्रिय होत असलेल्या ‘स्नॅपचॅट’ या सोशलसाईटला टक्कर देण्यासाठी फेसबुकने हे नवे फीचर आणले आहे. याबरोबरच फेसबुक लवकरच गुप्त आणि महत्त्वाच्या गोष्टी शेअर करण्यासाठी मेसेंजरमध्ये ‘सिक्रेट कॉन्व्हर्सेशन’ची सुविधा देण्याच्या विचारत आहे. यामध्ये केवळ पाठवणारा आणि ज्याला पाठवले तो असे दोघेच जण तो मेसेज पाहू शकणार. अगदी व्हॉटस्अॅपच्या ‘एन्ड टू एन्ड इन्स्क्रीप्शन’सारखेच असेल ते. यासाठी कंपनी ओपन व्हिस्परने विकसित केलेल्या ‘सिग्नल प्रोटोकॉल’चा वापर करणार आहे.ब्लॉगपोस्टद्वारे फेसबुकने याबाबत माहिती देताना लिहिले की, अनेक युजर्सनी आम्हाला विनंती केली की अत्यंत खासगी स्वरुपाची चॅट करताना सुरक्षेचे अधिक कठोर मापदंड असायला हवेत. त्यानुसार आम्ही ‘सिक्रेट कॉन्व्हर्सेशन’ची सुविधा सुरू करणार आहोत. खुद्द फेसबुकदेखील असे मेसेज वाचू शकणार नाही.टेस्टिंग करीता हे फीचर सध्या मर्यादित स्वरूपात उपलब्ध असून त्याद्वारे अद्याप व्हिडिओ, जीआयएफ सारख्या इतर मेसेंजर सुविधा नाहीएत.