दिवाळीत दिसा स्टायलिश !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2016 5:05 PM
कोणताही सण असो त्यात आपण स्टायलिश दिसावे असे प्रत्येकाला वाटते.
कोणताही सण असो त्यात आपण स्टायलिश दिसावे असे प्रत्येकाला वाटते. स्टायलिश दिसण्यासाठी आपण नवनवीन फॅशनेबल कपड्यांची खरेदी देखील करतो. यंदाची दिवाळी तोंडावर आली असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण कपड्यांची खरेदी करण्यासाठी लगबग करीत आहेत. विशेषत: महिला वर्गाला फॅशनेबल कपड्यांचे जास्त आकर्षण असते. बऱ्याचदा आपली कपड्यांची निवड चुकते आणि व्यक्तिमत्त्वावर त्याचा परिणाम जाणवतो. घेतलेले कपडे परिधान केल्यानंतर सूट होत नसल्याने ते वापरणे बंद करतो आणि घरातच पडून राहतात. आजच्या सदरात दिवाळीत आपण स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचे कपडे खरेदी करावेत याबाबत जाणून घेऊयात... जर या दिवाळीत आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांपेक्षा वेगळी पाडायची असेल, तर फॅशनेबल कपड्यांबरोबरच स्टायलिश कमरबेल्टची निवड करु शकता. तसेच आपल्या स्टाईलमध्ये वेगळेपण येण्यासाठी केप्स, इनबिल्ट दुपट्टा, ट्रेल्स आदि विविध डिजाइनर अॅससरीज परिधान करु शकता. त्यातच लहंगा, अनारकली आणि लच्छादेखील मार्केटमध्ये नव्या आकर्षक डिझाइनमध्ये उपलब्ध असून वापरू शकता. केप्ससोबतच प्रिंट केलेला लांब ड्रेस, पेपलम्सने सजविलेला सुंदर स्कर्ट, लच्छा आणि दुपट्टासोबत लहंगा, ट्रेल्सवाला ब्लाऊज, पारदर्शी दुपट्टासोबत कोल्ड शोल्डर आणि आॅफ शोल्डर चोळी आदी विशेष शैलीचे कपडे अधिक आकर्षक आहेत ते वापरु शकता. सिल्क, जॉर्जेट, शिफॉन, कच्चा सिल्क आणि टूले आदी या सीजनमध्ये प्रमुख कपडे आहेत. विशेष म्हणजे बहुतेक डिझायनरांनी ड्रेससोबतच कमरबेल्टचा देखील समावेश केला आहे. पेस्टल रंगासोबत गडद रंगाचे कपडे खूपच आकर्षक दिसतात. जेव्हा आपण गडद रंगासोबत हलके पेस्टल रंगाचे कपडे परिधान करणार असू तर आपण नक्कीच सुंदर दिसणार. लहान मुलांनाही बनवा स्टायलिश पारंपरिक पोशाख असो की आधुनिक कॅज्युअल कपडे, मुलांच्या बाबतीत अशी काळजी घ्या की, ते कपडे परिधान केल्यानंतर दिसायला चांगले असावेत. मुलांपेक्षा मुली फॅशनच्या बाबतीत जास्तच उत्साही असतात. जर आपल्या लाडलीने पारंपरिक कपडे परिधान केले नसतील तर यावेळी नेट, ब्रोकेड, सिल्क, जॉर्जेटपासून बनविलेला लहंगा, सलवार कमीज, शरारा, लांब जॅकेट, विविध रंगाचे अनारकली सूट परिधान करण्यास देऊ शकता. जर आपल्या मुलांना पारंपरिक पोशाख पसंत नसेल तर बाजारात उपलब्ध असलेल्या पश्चिमी पोशाखाची निवड करू शकता. फॉर्मल रूपांकन आणि प्रिंट वाले कपडे आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला उठावदार बनवतील. सीकुइंड जंपसूट, चमकते टॉप्स आणि पार्टीवेअर कपडे, गाऊन्स आणि अन्य फॅशनेबल कपडे सणासुदीत परिधान केले तर आपल्या राजकुमारीकडे नक्कीच सर्वांच्या नजरा वळतील. फॅशनच्या बाबतीत मुलेदेखील मुलींपेक्षा कमी नाहीत. आपल्या राजकुमाराचा लूक सर्वांपेक्षा वेगळा दिसण्यासाठी शेरवानी सूट, धोती-कुर्ता किंवा कुर्ता पायजमाची निवड करु शकता. तसेच व्यावहारिक कपड्यांमध्ये जीन्स, पायजमासोबतच बंद गळा सूट, नेहरू जॅकेट परिधान करु शकता. वेलवेटच्या कपड्यांपासून बनलेला नेहरु जॅकेट आपल्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वाला हटके लूक देईल. शक्यतो दिवाळी येण्याअगोदरच मुलांच्या कपड्यांची खरेदी करुन घ्या. या दिवाळीत त्यांची चांगली तयारी करा, जेणेकरुन त्यांच्याकडेही लोकांच्या नजरा आकर्षिल्या जातील.ravindra.more@lokmat.com