दिव्यांनी सजवा दिवाळी...!!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2016 6:14 PM
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव होय. दिवाळीतील प्रकाश दिव्यांशिवाय अपूर्णच आहे. झगमगणारे दिवे आपल्या घराला उत्सवाचे रुप देत असतात. या दिवाळीला जर आपण काही नवीन करु इच्छित असाल आणि आपणास काही सुचत नसेल तर दिव्यांचा वापर करुन काहीतरी क्रिएटिव्हीटी दाखवू शकता
-Ravindra Moreदिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव होय. दिवाळीतील प्रकाश दिव्यांशिवाय अपूर्णच आहे. झगमगणारे दिवे आपल्या घराला उत्सवाचे रुप देत असतात. या दिवाळीला जर आपण काही नवीन करु इच्छित असाल आणि आपणास काही सुचत नसेल तर दिव्यांचा वापर करुन काहीतरी क्रिएटिव्हीटी दाखवू शकता. प्रत्येकवर्षी घरात एकसारखे दिवे लावून आपण आणि पाहणारेदेखील कंटाळतात. यासाठी यावर्षी दिवाळीला नवीन प्रकारच्या दिव्यांचा प्रयोग कसा करावा याबाबत जाणून घेऊया...सर्वप्रथम बाजारातून मातीचे दिवे खरेदी करुन त्यांना रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यातील मातीमध्ये पाणी झिरपते आणि अतिरिक्त रंगदेखील पाण्यात निघून जातो. यानंतर दिवा तेल जिरवू शकणार नाही. पुढील दिवशी दिव्यांना बाहेर काढून कापडाने स्वच्छ करा आणि त्यानंतर दिव्यांवर पेंट किंवा मनासारखी डिझाईन काढा. दिव्यांना रंगविण्याअगोदर पांढरा रंग किंवा प्रायमरचा वापर करा, जेणेकरुन केलेले रंगकाम उठावदार दिसेल. प्रायमर कोरडे झाल्यानंतर मनासारख्या रंगाने दिव्यावर पेंट करु शकता. यासाठी लाल, मरून, पिवळा, हिरवा, नारंगी आणि निळ्या रंगाचा वापर करा, ज्याने आपला दिवा ट्रॅडिशनल दिसेल. रंग कोरडा झाल्यानंतर ब्रशने त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाने आवडेल ती डिझाईन काढू शकता. अशाने आपल्या दिव्यांना एथनिक लूकदेखील मिळेल. जर आपण मेहंदी लावण्यात एक्स्पर्ट असाल तर आपले हे कौशल्य दिव्यांना सजविण्यासाठी देखील वापरा. सिरॅमिक कोनमध्ये रंग भरून दिव्यांवर बारिक डिझाईन बनवा. फूल, पाने, मोर यांची चित्रे बनवून या दिव्यांवर लावले जाऊ शकतात. फक्त डिझाईन व्यतिरिक्त जर आपण दिव्यांना अजून वेगळा लूक देऊ इच्छित असाल, तर मोती, कुंदन व काच यांचा वापर करुन अधिक आकर्षक बनवू शकता. रांगोळी तसेच रंगीबेरंगी मोती, कुंकू, तांदूळ आणि कागदाचे फूल वापरुन देखील दिव्यांना सजवू शकता. सकारात्मक उर्जेचे प्रतिक दिवाहिंदू धर्मात दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व असून, दिवाळीत सर्वत्र प्रकाशमय वातावरण असते. या विशेष दिवशी नकारात्मकतेला दूर करण्यासाठी आणि सकारात्मक उर्जेच्या स्वागतासाठी दिवे लावले जातात. यासाठीच दिवाळीला दीपोत्सवदेखील म्हटले जाते. दिवाळीचे हे पावित्र्य जपण्यासाठी आपण बनविलेला दिवा शास्त्रशुद्ध पद्धतीने पेटविल्यास आपली दिवाळी अधिकच सुखकर ठरेल. यासाठी दिवाळीच्या दिवशी दिवा पेटविण्यासाठी शुद्ध तूप किंवा जवसाच्या तेलाचा वापर करा. तसेच दिव्यात किमान चार वाती असाव्यात, एक वात लक्ष्मी, दुसरी गणेश, तिसरी कुबेर आणि चौथी इंद्र देवासाठी. शुद्ध तुपाचे किमान पाच दिवे तरी असावेत. एक दिवा किचनमध्ये, दुसरा बेडरुममध्ये, तिसरा लिव्हिंग रुममध्ये, चौथा वॉशरुम आणि पाचवा घरातील अन्य खोलीत लावावा.