बंदूकीच्या बदल्यात खा मोठ्ठा पिझ्झा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2016 2:21 PM
‘डी अँड सी पिझ्झा’ नावाच्या पिझ्झा शॉपमध्ये तुम्ही जर तुमच्यापाशी असलेली बंदूक जर जमा केली तर तुम्हाला एक लार्ज साईज पिझ्झा मोफत दिला जाईल.
अमेरिकेमध्ये ‘गन कंट्रोल’वरून वातावरण तापलेले आहे. नागरिकांनी बंदूक बाळगावी की नाही यावरून सध्या तेथे जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्येसुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. यामध्ये आता इंडियानापोलिस शहरातील एका पिझ्झा शॉपने अनोखी शक्कल लढवली आहे.‘डी अँड सी पिझ्झा’ नावाच्या पिझ्झा शॉपमध्ये तुम्ही जर तुमच्यापाशी असलेली बंदूक जर जमा केली तर तुम्हाला एक लार्ज साईज पिझ्झा मोफत दिला जाईल. हॉटेलचा मालक डोनल्ड डॅन्सी म्हणतो की, सध्या अमेरिकेत जो हिंसाचार चालू आहे ते पाहून मन सुन्न होऊन जाते. शहराचे रस्ते जणू काही युद्धभूमी झाले आहेत. माझ्या हॉटेलात येणाऱ्या शाळकरी मुलांकडेसुद्धा बंदूक असते. त्यांना अशा घातक शस्त्र बाळगण्यापासून परावृत्त करण्यासाठी आम्ही ही आॅफर सुरू केली.पण लोक पिझ्झाच्या बदल्यात बंदूक हस्तांतरित करतील का? यावर डोनल्ड म्हणतो, हो नक्कीच! जमा झालेल्या बंदूक तो पोलिसांना देणार आहे. परंतु शहरातील पोलिसांनी जो पर्यंत अधिकृत परवानगी मिळत नाही तोपर्यंत ही आॅफर सुरू न करण्यास सांगितले आहे.