-सारिका पूरकर-गुजराथी
जगणं अस्वस्थ करणाऱ्या पर्यावरणीय बदलांकडे पाहिलं की इकोफ्रेंडली जगण्याचं महत्त्वं कळतं. पण नुसतं महत्त्वं कळून कसं चालेल? ते अमलात आणायचं तर आपल्यापासून, आपल्या घरापासून सुरूवात करावी लागेल ना. एक प्रयोग म्हणून इकोफ्रेंडली घर सजवून बघितलं तर!‘इको फ्रेंडली’ ही संकल्पना निसर्ग, पर्यावरण आणि पर्यायानं माणूस वाचवण्यासाठी आपल्या जगण्यात रुजवणं किती आवश्यक आहे याचे संकेत मिळायला लागले आहेत. ग्लोबल वॉर्मिंग, महापूर, भीषण दुष्काळ, भुस्खलन यांसारख्या आपत्तींमुळे आपल्या सर्वांनाच ते हळूहळू पटू देखील लागलंय. आता फक्त ही संकल्पना प्रत्यक्षात कृतीत आणावयाची आहे. त्यसाठी फार नाही फक्त आपल्या घरात पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर केला तरी पुरेसे आहे. इको फ्रेंडली ही संकल्पना प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी तो देखील मोलाचा हातभार असणार आहे. घर सजावटीसाठी तुम्ही महागड्या, परदेशी बनावटीच्या वस्तू वापरत असाल तर त्याऐवजी पर्यावरणपूरक गोष्टींची मदत घेऊन बघा.
१) पुर्नवापर ही संकल्पनाही इको फ्रेंडली घर सजावटीत महत्वाची आहे. कारण विविध प्रकारचा कचरा सगळीकडे वाढतोय, त्यात सजावटीच्या वस्तूंच्याही कचऱ्याचा समावेश होतोच की. मग याच वस्तूंना पुर्नजिवित करुन वापरलं तर काय हरकत आहे? कचरा कमी होईल की नाही? उदाहरण द्यायचं झालं तर हल्ली ओएलएक्सवर विकून टाका विकून टाकाचा धोषा लावलेला असतो. त्यावरुन किंवा जवळच्या एखाद्या रिसेल शॉपमधून तुम्ही काही वस्तू घेऊन, त्यांना घरी रंगवून आकर्षक, नवा लूक देऊ शकता.
२) घरात मॉडयुलर कार्पेट स्क्वेअर्स (चौकोनी तुकड्यांच्या स्वरुपात मिळणारे कार्पेट) अंथरा. कारण हे कार्पेट स्क्वेअर्स घातक विषारी रासायनिक द्रव्यांचा वापर न करता बनवलेले असतात. सहज बदलवताही येतात. शिवाय एका रंगाचा कंटाळा आला तर ते तुम्ही तुमच्या विक्रेत्याकडून रिप्लेस करुन घेऊ शकता.
३) घरातील खिडक्यांवर वॉटर वॉल बनवून घेऊ शकता. पाण्यामुळे दिवसभर छान गारवा, प्रसन्न अनुभूती मिळेल. त्यासाठी काचेच्या बरण्यांमध्ये पाणी भरुन त्यांची मांडणी खिडकीवर करा. काही वेळेस खाण्याचे रंग मिसळून हे पाणी रंगीत करा. सायंकाळी दिवे लागल्यावर सुंदर लूक मिळतो.
५) फर्निचर खरेदी करतानाही पर्यावरणपूरक साहित्यालाच प्राधान्य द्या. बांबू, कॉर्क लाकूड, बीच लाकूड, स्टेनलेस स्टीलसारखे धातू, लोकर,ज्यूट, गोणपाट यासारखे धागे वापरुन तयार केलेले फर्निचर खरेदी करा. कारण पुर्नवापर , नैसर्गिक प्रक्रियेनं हे साहित्य तयार केलं जातं. या फर्निचरमुळेही घराला स्टायलिश लूक मिळेल.
६) घराच्या भिंतीही नॉन टॉक्सिक म्हणजे विषारी रासायनिक द्रव्येविरहित इको फ्रेंडली रंगांनी रंगवा.
७) घरातील कोणतंही फर्निचर,स्टील वेस्टेज, अॅल्युमिनियम स्क्रॅप यांचा पुर्नवापर करुन कलात्मक सजावट साकारण्यावर भर द्या.
८) दिवाणखाना, टेरेस सजविण्यासाठी सुंदर फुलझाडं, इनडोअर प्लाण्ट्सचा वापर करा.
हे एवढं करूनही आपण ‘इको फ्रेण्डली’ जगण्याचा आनंद घेवू शकता!