एलिट खेळाडूंना येत नाही लवकर मानसिक थकवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2016 5:42 PM
एलिट अॅथेलिटस्मध्ये मानसिक थकव्याला रोखून ठेवण्याची कमालीची क्षमता असते.
खेळाडूंची शरीरयष्टी, शारीरिक क्षमतेचा सर्वांनाच हेवा वाटतो. मानसिक आणि शारीरिक क्षमतेची टोकाची कसोटी लागणारे खेळ खेळणारे एलिट अॅथेलिटस्मध्ये मानसिक थकव्याला रोखून ठेवण्याची कमालीची क्षमता असते. एका नव्या अध्ययनातून खेळाडूंच्या या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.या अध्ययनामध्ये ११ व्यावसायिक तर नऊ हौशी सायकलस्वारांचा अभ्यास करण्यात आला. प्रयोगशाळेत घेण्यात आलेल्या टाईम ट्रायलमध्ये व्यावसायिक सायकलस्वार हौशी सायकलस्वारांवर भारी पडले. मानसिक थकवा वाढवणारे संगणकीय टास्क पूर्ण केल्यावर हौशी सायकलस्वारांचा वेग मंदावला; मात्र प्रोफेशनल्सवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.एवढेच नाही तर, इच्छाशक्तीच्या बाबातीतही प्रोफेशनल सायकलस्वार हौशींपेक्षा सरस ठरले. कें टस् स्कूल आॅफ स्पोर्ट अँड एक्सरसाईज सायन्सेसच्या सॅम्युएले मार्कोरा यांनी सांगितले की, मानसिक थकवा जितका कमी तेवढी इच्छाशक्ती कायम व प्रबळ राहते. सायकल रेसच्या शेवटच्या टप्प्यात ती टिकून राहणे निर्णायक असते.मानसिक थकव्याला थोपविण्याची क्षमता प्रामुख्याने अनुवांशिक जरी असली तरी संशोधकांना वाटते की, जीवतोडून घेतलेले प्रशिक्षण, सराव, मेहनतदेखील तेवढीच कारणीभूत आहे. मग काय विचार करताय? काढा सायकल आणि मारा पेडल...