कमी जागेतही फुलवा सुंदर बाग !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2017 3:52 PM
आपल्या घराच्या अवतीभोवती सुंदर बाग असावी असे बहुतेक लोकांना वाटते, मात्र जागेअभावी किंवा वेळेअभावी काहीच करू शकत नाही.
-रवींद्र मोरे आपल्या घराच्या अवतीभोवती सुंदर बाग असावी असे बहुतेक लोकांना वाटते, मात्र जागेअभावी किंवा वेळेअभावी काहीच करू शकत नाही. पण व्यस्त लाईफमधून थोडा वेळ काढून तसेच क्रिएटिव्ह माइंड वापरून कमी जागेत का होईना, आपण अगदी कमी जागेतही स्वप्नातली सुंदर बाग फुलवू शकतो.* यासाठी काचेच्या जुन्या बशीत थोडंसं पाणी घेऊन गाजर, मुळा, बीट यांच्या पानांकडच्या बाजू कापून थोड्या जाड चकत्या घ्या. बशीतल्या पाण्यात या चकत्या ठेवल्यास देठांना कोंब येतील, कोंब थोडे मोठे झाले म्हणजे या चकत्या डबा किंवा कुंडीतल्या मातीत लावा. आपल्याला गाजर, मुळा, बीट यांचा पाला खायला मिळेल. या पानांची कोशिंबीर बनवून वापरू शकता. * लसूण पाकळयांचा बुडाकडचा भाग अर्ध्या उंचीपर्यंत ओल्या मातीत खोचून ठेवल्यास थोड्या दिवसांनी वरच्या भागातून कोंब येईल आणि पात वाढली म्हणजे लसूण पात घरच्या घरी मिळेल.* बऱ्याचदा मिरच्या कापल्यास खाली बिया पडतात. आपण त्या बिया फेकून देतो. मात्र खाली पडलेल्या बिया एखाद्या मातीच्या डब्यात टाकत राहिल्यास त्याला कोंब फुटून रोपं तयार होतील. मिरची रोपाला लागल्यावर लगेच खुडलीत तर कमी तिखट असेल, उशिरा खुडलीत तर अधिक तिखट मिळेल. जेवढ्या मिरच्यांची खुडणी कराल, तेवढ्या अधिक मिरच्या मिळतील.* फुलपुडीतून येणारी झेंडूची फुलं सुकल्यावर फेकून न देता एका कुंडीत टाका. रुजून कोंब येतील आणि छोटी छोटी झेंडूची फुलं धरतील. मध्यम सूर्यप्रकाशाच्या जागी ही कुंडी छान फुलते.* बाजारातून आणलेला शेवंतीचा गजरा सुकला म्हणजे कुस्करून कुंडीत टाका. पिवळ्या शेवंतीने भरलेली कुंडी घरात ऊन येतं अशा कोपºयात ठेवा म्हणजे ती तुमच्या घरात आनंद फुलवत राहील. झाडांना पाणी घालताना काळजी घ्याझाडांना पाणी जास्त घालू नका. माती ओली ठेवण्यापुरतंच घाला. जर पालेभाज्यांचे देठ, चहाचा चोथा असं वापरत असलात तर पाणी फारसे घालण्याची गरज नाही. घरात खूप झाडं झाली म्हणजे भांडी घासायच्या आधी साबण न लावता भांडी विसळून घ्या आणि ते पाणी झाडांना थोडं थोडं घाला. वेगळं पाणी वापरण्यापेक्षा हे पाणी अधिक सकस ठरतं. शिवाय पाण्याची बचतही होईल.