- अमृता कदम
रिमझिम बरसणाऱ्या पावसाचा आवाज गाड्यांच्या कर्कश हॉर्नमध्ये विरु न जातोय. काळ्या मेघांनी आकाश दाटल्यावर मनात छान आठवणी दाटून येण्याऐवजी आज आॅफिसला प्रवास कसा करायचा याची चिंता लागलीये. याचा अर्थ तुम्ही अशा शहरात राहताय जिथे तुम्हाला पावसाची मजा अनुभवता येणार नाही. शहराचा हा झगमगाट बाहेर सोडून किमान आठवडाभरासाठी तरी पावसाचा आनंद लुटायला बाहेर पडा. पावसाळी पर्यटनाच्या रूटीन ठिकाणांपेक्षा वेगळी ठिकाणं पाहायची असतील तर थेट कोलकाता गाठा. या शहराच्या जवळपास अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे गेल्यावर तुम्हाला कळेल की पावसाळा किती प्रकारानं तुम्हाला नवी उर्जा देत असतो.
कोलकत्तामधलं पावसाळी पर्यटन
अजोध्या हिल्स
हिरव्यागार टेकडीवर काळे ढग हलक्या पावसाचा वर्षाव करताहेत आणि पायथ्याला निळ्याशार पाण्याचा तलाव दिसतोय असं चित्र जर तुम्ही मनोमन रेखाटत असाल तर कोलकात्यातल्या पुरूलियाजवळचं ‘अजोध्या हिल्स’ हे तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे. इथल्या जैवविविधतेचा आनंद लुटत ट्रेंकिग करण्यासाठी अनेक पॉर्इंटस इथे उपलब्ध आहेत. गोरगाबुरु हिल हे या रांगांमधलं सर्वोच्च शिखर तर त्यासाठी सर्वात उत्तम. शिवाय इथल्या अनेक टेकड्यांवरचे छोटे छोटे धबधबेही आनंद देतात. यातही इथला ‘बामनी’ धबधबा चुकवू नये असा. याला लागूनच खैराबेराचा तलाव आहे, जिथे तुम्हाला अत्यंत दुर्मिळ अशा पक्षांच्या निरीक्षणाची संधीही मिळेल. अजोध्या हिल्स कोलकात्यापासून 250 किमी अंतरावर आहेत. लालमती एक्सप्रेस किंवा हावडा- चक्रधरपूर एक्सप्रेस हा इथं पोहचण्याचा सर्वांत उत्तम मार्ग. बारभूम हे इथलं जवळचं स्टेशन आहे. अजोध्या हिल्सचं प्रवेशद्वार मानलं जाणाऱ्या बाघमुंडी गावापासून हे स्टेशन अवघ्या काही मीनिटांच्या अंतरावर आहे. बाघमुंडीत राहण्यासाठी अनेक बजेटमधली हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसेस उपलब्ध आहेत. ताजपूर समुद्र, वाळूचे किनारे आणि सूर्योदय किंवा सूर्यास्ताचा देखावा हे खरंतर लोकांचं आवडतं कॉम्बिनेशन आहे. पण खरे रसिक पावसळ्यातही समुद्रकिनाऱ्यांना पसंती देतात. समुद्राच्या साक्षीनं पाऊस अनुभवण्यासाठी कदाचित ताजपूरसारखं दुसरं ठिकाण नाही. बंगालच्या खाडीत थोडं धाडस करून तुम्ही पावसासोबत उधाणलेल्या समुद्राच्या साक्षीनं लॉन्ग वॉक करु शकता. एका बाजूला दाड झाडी आणि सोबत लाटा शिवाय आजूबाजूला हजारो लाल खेकडेही तुम्हाला त्यांचा निवारा शोधत धावताना दिसतील. अगदीच सावध स्वभावाचे असाल तर बीचवरच्याच छोटेखानी हॉटेलमध्ये एखादं टेबल पकडून अगदी बसल्या बसल्याही तुम्हाला निसर्गाचे अनेक रंग अनुभवता येतील.
ताजपूर
कोलकात्यापासून 180 किमी अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग 17 किंवा 6 वरु न प्रवास केला तर तुम्ही चार तासांत इथे पोहचू शकता. किंवा दिघापर्यंत ट्रेन आणि तथून पुढे एखादी टॅक्सी भाड्यानं घेऊनही इथे पोहचता येतं. ताजपूरमध्ये मध्यम रेंजमधली अनेक रिसॉर्टस आणि बजेट हॉटेल्स उपलब्ध आहेत. काही तर अगदी किनाऱ्याला लागूनही आहेत.
मोनचाशा, पौशी
पौशी हे पूर्व मिदनापूरच्या जवळ असलेलं एक छोटं खेडेगाव आहे. लाल मातीचे रस्ते सोडले तर सगळीकडे फक्त हिरवळ, हिरवळ आणि आजकाल दुर्मिळ झालेली मातीची घरं असं नॉस्टॅल्जिक करणारं दृश्य तुम्हाला इथं दिसतं. इथल्या बडगा नदीचं खारं पाणी फक्त पावसाळ्यातच गोडं बनतं. बंगाली पद्धतीच्या पारंपरिक भोजनाचा मनमुराद आस्वाद तुम्ही घेऊ शकता. शिवाय वातावरणानं साथ दिली तर इथल्या टेकडीवर वसलेल्या सरपाई सरबामांगला मंदिराचीही सैर तुम्ही करु शकता. हावडापासून कोन्तायपर्यंत ट्रेनची सुविधा आहे. तिथून पुढे 150 किमी अंतरावर वसलेल्या पौशीसाठी भाड्यानं टॅक्सी उपलब्ध असतात. मोनचासामध्ये बांबू कॉटेजेसमध्ये राहण्याची उत्तम सोय आहे.
खोआय
टागोरांच्या कवितांमध्ये स्थान मिळवलेल्या बोलपूरच्या खोआय परिसरात नक्कीच काहीतरी भारावून टाकणारं दडलंय. खरंतर इथल्या निसर्गसंपन्नेतमुळे इथं वर्षभर पर्यटकांची रेलचेल सुरु च असते. पण जवळच्या शोनाझुडी जंगलाचं सौदर्य पावसाळ्यात आणखी खुलतं. शिवाय इथे आल्यावर बल्लवपूर अभयारण्याला भेट देणं आणि टागोरांच्या शांतीनिकेतनचा परिसर पाहणं अशा दोन्ही गोष्टीही साध्य होतात. हावडा ते बोलपूरदरम्यान रोज अनेक ट्रेन धावतात. शिवाय लक्झरी बसेसही या मार्गावर उपलब्ध आहेत. या भागात अनेक गेस्ट हाऊसेस आणि फार्म हाऊसेस राहण्यासाठी उपलब्ध आहेत. शोनाझुडी रिसॉर्टही निवासासाठी उत्तम.
झारग्राम
इथे येणारे अनेक पर्यटक हे वास्तुकलेचा अद्धुत नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झारग्राम राजवाड्याला भेट द्यायला येतात. बाग-बगीच्यांनी वेढलेल्या या राजवाड्याचं सौंदर्य अगदी डोळ्यात न मावणारं. आजूबाजूला घनदाट जंगल, ट्रेकिंगचे अनेक स्पॉट उपलब्ध असल्यानं पावसळ्यातला इथला अनुभव आनंद द्विगुणित करणारा ठरतो. स्थलांतरित पक्षांसाठी स्वर्ग म्हणून ओळखला जाणारा खंदारानी तलाव आवर्जून भेट द्यावा असाच! शिवाय इथला केतकी धबधबा पावसळ्यात ऐन बहरात असतो. झारग्राम हे कोलकात्यापासून 170 किमी अंतरावर आहे. हावडा आणि झारग्रामदरम्यान इस्पात किंवा कोरापूत एक्सप्रेससारख्या ट्रेन धावतात. अनेक बजेट हॉटेल्स उपलब्ध आहेत, पण राजबरी टुरिस्ट कॉम्प्लेक्स हा झारग्रामच्या अगदी शेजारी वसलेला परिसर राहण्यासाठी उत्तम. अजूनही तुम्ही मान्सून ट्रीपसाठी बाहेर पडला नसाल, तर यांपैकी एका ठिकाणाला भेट देण्यासाठी नक्की प्लॅन करा.