-सारिका पूरकर-गुजराथी
दिवसभराची घरातली आणि आॅफिसमधली दगदग, ताण-तणाव, चिंता या साऱ्यांपासून थोडे निवांत क्षण देणारी जागा म्हणजे घरातील बेडरुम. एक पर्सनल, स्वत:ची, स्वत:ला वेळ देता येणारी खोली. साहजिकच ही खोली सजावटीपेक्षाही तुम्हाला कम्फर्ट कसा मिळेल यादृष्टीनं परिपूर्ण असायला हवी. या कम्फर्ट देणाऱ्या घटकांमध्ये सर्वात महत्वाचा असतो तो बेड. बेडवर पडल्या-पडल्या तुम्हाला रिलॅक्स फील मिळायला हवा. आता हा फील हवा असेल तर त्यासाठी बेडदेखील प्रसन्न ठेवायला हवा नाही का? आणि त्यासाठीच योग्य बेडशीटची निवड खूप महत्वाची ठरते. बेड म्हणजे फक्त सात-आठ तास झोपण्यासाठीच नसतो तर एरवीही तुम्हाला बघताच क्षणी शांततेची अनुभूती देणारा घटक असतो. आणि म्हणूनच शांत झोपेसाठी योग्य बेडशीट खूप महत्वाची गुंतवणूक असते. महागड्या मॅट्रेस बेडवर घातल्या परंतु बेडशीटच योग्य नसेल तर सजावटीसोबतच झोपेचंही खोबरं झालंच म्हणून समजा. बेडशीट निवडताना या टिप्स तुम्हाला नक्की मदत करू शकतील!
बेडशीट निवडताना
१) फेब्रिकची योग्य निवड बेडशीट विविध फेब्रिकपासून बनतात. त्यापैकी तुम्हाला कोणतं फेब्रिक अधिक आरामशीर, आल्हाददायक वाटतं ते ठरवा. बेडशीट सहसा कॉटन, सॅटिन, सिल्क या तीन प्रमुख फेब्रिकपासून बनतात. सर्वाधिक पसंती कॉटनच्या बेडशीट्सलाच असते. कारण त्याचा मऊपणा सर्वांनाच जास्त भावतो. मात्र कॉटनमध्येही अनेक प्रकार असतात. ते देखील ट्राय करायला हवेत. कॉम्बड कॉटन हे सर्वात मऊसूत असतं. सुपिमा कॉटन बेडशीट्स लहान मुलं, कॉलेज गोर्इंग जनरेशनसाठी बेस्ट आॅप्शन ठरते . मस्लिन कॉटन हे थोडे कमी मऊ असतं परंतु आकर्षक प्रिंट्समुळे हे बेडशीट सुंदर दिसतं. याव्यतिरिक्त इजिप्तियन, जर्सी कॉटन, फ्लॅनेल कॉटनपासूनही बेडशीट बनतात. सॅटिन किंवा सिल्कचे बेडशीट तुम्हाला रॉयल, शाही लूक देते. शिवाय सॅटिन/सिल्कच्या बेडशीट्समुळे कोणत्याही अॅलर्जीचा त्रास होत नाही. हे बेडशीट्स दीर्घकाळासाठी तेवढेच सुंदर दिसतात, कारण याचे रंग जात नाही, प्रिंट खराब होत नाही. उन्हाळ्यात या बेडशीट्स घामाच्या त्रासापासूून वाचवतात, उष्णता कमी करतात. २०१७ मध्ये मात्र लिनन ट्रेंंड हिट ठरलाय. थोडा महागडा पर्याय आहे हा परंतु कम्फर्ट आणि लूक या बाबतीत एकदम वरचढच आहे.
२) रंग आणि पॅटर्नची निवड बेडशीट हा असा घटक आहे की जो तुमच्या बेडरुमचा चेहराच बदलून टाकतो. त्याकरिताच रंग आणि पॅटर्न निवड खूप विचार करुन करावी लागते. सध्या तर हजारो रंग, असंख्य पॅटर्न, डिझाईन्स उपलब्ध आहेत, त्यातून एखादा पॅटर्न, रंग निवडणं अवघड असतं. थ्रीडी बेडशीट्सही आल्या आहेत बाजारात. परंतु सध्या फ्लोरल प्रिंट्स, अॅबस्ट्रॅक्ट डिझाईन्सचा ट्रेण्ड लोकप्रिय ठरत आहे. त्याचबरोबर पोलका डॉट, चेक्स डिझाईनही हटके लूकसाठी मस्त पर्याय आहे. सॉलिड कलर्स, स्ट्रिप्सही ट्राय करायला हरकत नाही. एकूणच घराच्या अन बेडरुमच्या रंगसंगतीनुसार बेडशीटचे रंग निवडणं केव्हाही चांगलं. सध्या ब्राईट, निआॅन रंगांना पसंती मिळतेय. एरवी तुम्ही क्रीम, पिच, आकाशी अशा शेड्समधील बेडशीट्स वापरु शकता.
३) योग्य आकार हवा बेडशीट्स हे बेडच्या आकाराप्रमाणे तयार होतात. बेडचे विविध आकार असतात. केवळ सिंगल आणि डबल बेड एवढेच आकार लक्षात ठेवून बेडशीट बनत नाहीत. तर ट्विन (३९ इंच रुंद व ७५ इंच लांब ), ट्विन एक्स एल ( ३९ इंच रुंद व ८० इंच लांब ), फुल (५३ इंच रुंद व ७५ इंच लांब ), क्वीन (६० इंच रुंद व ८० इंच लांब ), किंग ( ७६ इंच रुंद व ८० इंच लांब ), कॅलिफोर्निया किंग ( ७२ इंच रुंद व ८४ इंच लांब ) या आकारात बेड आणि बेडशीट्स बनतात. त्यामुळे तुमच्या बेडचा आकार ठरवा आणि त्यानुसार बेडशीट निवडा. फिटेड शीट म्हणूनही प्रकार मिळतो (ज्याला आपण सोप्या भाषेत गादी खराब होऊ नये म्हणून वापरतात ती खोळ) तो देखील मॅट्रेसला बसवायला हवा.
४) योग्य काळजी बेडशीट्स नियमितपणे, पॅकवर, स्टोअरमध्ये दिलेल्या सुचनेनुसार धुवत चला. शक्यतो थंड पाण्याचा आणि चांगल्या प्रतीच्या डिटर्जंट पावडरीचा वापर करा. जेणेकरुन रंग जाणार नाही. बेडशीटस ड्रायरमधून काढल्यावर उन्हात टाकू नका. इस्त्री करा. जर इस्त्री क्रायची नसेल तर वाळली की लगेच त्याची छान घडी घालून कपाटात ठेवा.