उंच व्यक्तींना असते उजव्या विचारांचे आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2016 12:49 PM
व्यक्तीची उंची किती यावरून त्याचे राजकीय विचार काय असतील याविषयी कल्पना केली जाऊ शकते असे संशोधकांचे म्हणने आहे.
निवडणूका आल्या की, आपल्या पक्षाशी जास्तीत जास्त मतदार जोडण्यासाठी खटाटोप सुरू होतो. कोण कोणाला मत करतो याविषयी जरी गुप्तता पाळली जात असली तरी एखाद्या व्यक्तीचा राजकीय कल काय असेल याविषयी अंदाज काढता येऊ शकतो. ते कसं? तर उंचीवरून. व्यक्तीची उंची किती यावरून त्याचे राजकीय विचार काय असतील याविषयी कल्पना केली जाऊ शकते असे संशोधकांचे म्हणने आहे. व्यक्तीची उंची जितकी जास्त तेवढा तो उजव्या विचारसरणीकडे (कन्सर्व्हटिव्ह) आकर्षित होण्याची अधिक शक्यता असते. परंपरावादी उमेदवार/पक्षाला समर्थन करणे ते पसंत करतात.ओहायो राज्य विद्यापीठातील सहायक प्राध्यापक सेरा व्हॅटस्न आणि ‘बेट्स व्हाईट एलएलसी’ या आर्थिक सल्लागार कंपनीतील वरिष्ठ अर्थतज्ज्ञ राज अरुणाचेलम यांनी मिळून केलेल्या संशोधानात असे दिसून आले की, उंचीमध्ये प्रत्येक एक इंचाच्या वाढीसह कन्सर्व्हटिव्ह पार्टीचे समर्थन ०.६ टक्क्यांनी वाढते तर मत पडण्याची शक्यता ०.५ टक्क्यांनी वाढते.उंची आणि राजकीय विचारसरणीचा संबंध स्त्री आणि पुरुष असा दोहोंमध्ये आढळून येतो. पण पुरुषांमध्ये हे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त असते. २००६ साली केलेल्या ‘ब्रिटिश हाऊसहोल्ड पॅनल स्टडी’ सर्वेक्षणातील माहितीचा संशोधकांनी अभ्यास केला. या सर्व्हेमध्ये ९७०० पेक्षा जास्त प्रौढ व्यक्तींनी सहभाग नोंदवून आपली उंची, सविस्तर मिळकत आणि राजकीय विचारसरणीसंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे दिली होती.