सजावटीने घराला येईल घरपण !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 7:42 AM
सजावटीचे अवडंबर न करता माफक प्रमाणात केलेली सजावट घराला आल्हाददायकपणा देणारी ठरते. बदलत्या जीवनशैलीबरोबर सजावटीचे ट्रेंडही बदलत आहेत. त्यांचा वापर केला तर घराला प्रसन्न लूक देता येईल.
-रवींद्र मोरे आपल्या घरात कोणी आलं की घर पाहून त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. घरात अशी प्रसन्नता आणण्यासाठी गृहसजावटीला फार महत्त्व आहे. घराच्या अंतर्गत सजावटीमध्ये रंगसंगती आणि फर्निचरबरोबर प्रकाशयोजना, अंतर्गत व्यवस्था, जास्तीत जास्त मोकळ्या जागेची व्यवस्था, सुशोभिकरण यासारख्या अन्य बाबीही महत्त्वाच्या ठरतात. अंतर्गत सजावट करताना उपलब्ध जागेचा विचार करावा लागतो. अंतर्गत रचनेमध्ये घराचं प्रवेशद्वार फार महत्त्वाचं आहे. सुंदर, स्वच्छ आणि रुंद प्रवेशद्वार, तेथे वेलींचा विळखा किंवा कुंडीतील आकर्षक फुलझाडं कोणाच्याही मनाला भुरळ घालतात. दरवाजाचा रंग थोडा गडद आणि आकर्षक असावा. सजावटीचे अवडंबर न करता माफक प्रमाणात केलेली सजावट घराला आल्हाददायकपणा देणारी ठरते. बदलत्या जीवनशैलीबरोबर सजावटीचे ट्रेंडही बदलत आहेत. त्यांचा वापर केला तर घराला प्रसन्न लूक देता येईल.लिव्हिंग रूम घरातील सर्वांच्या उठण्या बसण्याची जागा असते. आजकाल टीव्ही लिव्हिंग रूममध्ये ठेवण्याऐवजी फॅमिली रूममध्ये ठेवतात. त्यामुळे या खोलीत सर्वजण ऐसपैस बसू शकतील इतकी पुरेशी जागा असावी. घरात कोणी प्रवेश केला की त्याचं आगमन आधी लिव्हिंग रूममध्ये होतं. त्यासाठी तेथे आकर्षक रंगसंगती असायला हवी. या खोलीमध्ये आॅफ व्हाईट, यलो, क्रीम, लेमन, पिस्ता अशा रंगांना पसंती दिली जाऊ लागली आहे. तथापि, ही जागा मोठी असेल तर गडद रंग, वॉलपेपर, टाईल्स क्लाऊडिंग वापरलं जाऊ लागलं आहे. या खोलीत लावण्यात येणारे फोटो किंवा पेंटिंग्ज हसरी, खेळकर, आल्हाददायक वाटेल अशी असावीत. त्यासाठी काही थीमबेस्ड पेंटिंग्जही घेऊ शकतो. डायनिंग रूममध्ये घरातील सर्वजण एकत्र बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. त्यामुळे तेथे व्यवस्थित प्रकाश असावा. प्रकाशयोजना करताना खुर्च्यांवर बसलेल्या व्यक्तींच्या सावल्या टेबलवर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. स्वयंपाकघर हा घरातील महत्त्वाचा भाग. याची सजावट, गृहोपयोगी वस्तूंची मांडणी हे थोडं अवघड काम असतं. येथे सर्व अत्यावश्यक गृहोपयोगी वस्तू हाताच्या टप्प्यात येतील अशा ठिकाणी असाव्यात. स्वयंपाक करताना दिल्या जाणाऱ्या फोडण्यांमुळे श्वास घुसमटू नये यासाठी शेगडीजवळ मोठी खिडकी असावी. तसंच तेथे एक्झॉस्ट फॅन किंवा चिमणी लावणं आवश्यक आहे. बेडरूम हादेखील घरातील महत्त्वाचा भाग. बेडरूममध्ये फिक्कट, निळा, आकाशी किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा. मुलांची बेडरूम ही खेळण्यासाठीदेखील असते. या खोलीचे दोन स्वतंत्र विभाग करावेत. त्यापैकी एक खेळण्यासाठी तर दुसरा विभाग अभ्यासाची पुस्तकं, स्टडी टेबल इत्यादीसाठी असावा. मुलांचा स्वभाव शांत असेल तर त्या खोलीला उजळ रंग लावावा. मूल चंचल स्वभावाचं असेल तर शांत आणि आल्हाददायक रंगाचा वापर करावा. मुलींच्या बेडरूमला फिकट जांभळा किंवा गुलाबी रंग वापरावा.