कोणतेही आऊटफिट चपला किंवा शूजशिवाय पूर्ण होत नाही. सध्याची तरूणाई नवीन नवीन फॅशन फॉलो करत असल्यामुळे कपड्यांना अनुसरून मॅचिंग चपला किंवा शूज वापरण्यावर भर दिला जातो. बऱ्याचदा नवीन शूज घातल्याने शू-बाईटच्या त्रासाला सामोरे जावे लागते. शूज विकत घेताना तुम्ही कितीही ट्रायल घ्या किंवा चालून बघा, परंतु जेव्हा तुम्ही वापरता त्यावेळी शू-बाइटचा त्रास सहन करावाच लागतो. यामुळे पायाला जखम होते, यामुळे पायाला फार वेदना होतात. या जखमेचे व्रण जखम बरी झाल्यावरही तसेच राहतात. बऱ्याचदा या जखमेमुळे इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. जाणून घेऊयात शू-बाइटपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय...
- शू-बाइट झाल्यावर नारळाचे तेल हा त्यावरील रामबाण उपाय आहे. पाय व्यवस्थितपणे स्वच्छ करून जिथे-जिथे शू-बाइट झाले आहे, तिथे नारळाचे तेल लावावे. असे दिवसातून दोन ते तीन वेळा करा. यामुळे जखम बरी होण्यास मदत होते तसेच जखमेचे व्रणही नाहीसे होतात.
- मधाचा वापर करूनही तुम्ही शू-बाइट बरे करू शकता. मध आणि तीळाचे तेल सारख्या प्रमाणात एकत्र करून लेप तयार करून जखमेवर लावावा. हा लेप सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावा. त्यामुळे पायांना आराम मिळण्यास मदत होईल.
- शू-बाइट झाल्यावर जखमेवर जळजळ होत असते. यावर उपाय म्हणून कोरफडीचा वापरही करता येतो. जखमेवर कोरफड लावल्याने कोणत्याही प्रकराच्या इन्फेक्शनची चिंताही दूर होते. कोरफडीचा गर दिवसातून दोन ते तीन वेळा जखमेवर लावावा. आराम मिळेल.
- बदामाचे तेल जखमेवर लावून थोडा वेळ मसाज केल्याने जळजळ आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
- तांदळाच्या पीठामध्ये अॅन्टीबॅक्टेरिअल गुण असतात. थोडे पीठ घेऊन त्याची पेस्ट तयार करा आणि शू-बाइट झालेल्या ठिकाणी लावा. सुकल्यानंतर पाण्याने धुऊन घ्या आणि त्यावर नारळाचे तेल लावा.
- कडुलिंब आणि हळदीची पेस्टही शू-बाइटवर गुणकारी ठरते. कडुलिंबाची ताजी पाने आणि हळदीमध्ये थोडे पाणी टाकून पेस्ट बनवा आणि त्वटेवर लावा. जवळपास २० मिनिटे झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.
- शू-बाइटमुळे खूप त्रास होत असेल आणि लगेच फरक पडेल असा उपया हवा असेल तर अशावेळी बर्फाचा तुकडा पातळ कपड्यामध्ये गुंडाळून हळूहळू जखमेवर फिरवा. असे केल्याने दुखण्यावर लगेच आराम मिळेल.
- नवीन चपला किंवा शूजमुळे पायांना लागत असेल तर शूजच्या किनाऱ्यावर पेट्रोलिअम जेली लवावी. यामुळे शूजचे किनारे नरम होतील आणि शू-बाइटच त्रास होणार नाही.
- शू-बाइट झाल्यानंतर जोपर्यंत पायाची जखम बरी होत नाही तोपर्यंत तो शूज घालणे टाळावे.