- सारिका पूरकर-गुजराथीमॉर्डन स्टाइलच्या घरांमध्ये हॉलपासून बाथरूमपर्यंत सर्व जागांना एथनिक लूक देता येतो. त्यासाठी खूप काही वेगळं नाही तर एथनिक निवडावं लागतं इतकंच! चायनीज, इटालियन फूड कितीही खाल्लं तरी आपल्या वरण-भाताची सर त्यास येत नाही हेचं खरं. हेच सत्य आपल्या घराच्या सजावटीच्या बाबतीतही आहे. घर सजवण्यासाठी कितीही लेटेस्ट ट्रेण्ड ट्राय केले तरी ट्रॅडिशनल, एथनिक, भारतीय परंपरेचे प्रतिबिंब असलेली सजावट घराला काही वेगळाच चार्म देते. या चार्मसाठी वेगळे काही नाही तर एथनिक प्रयत्न करावे लागतात इतकंच. पारंपरिक भारतीय सजावटीत लाकूड आणि माती या दोन घटकांचा वापर जास्त आढळतो एवढं साधं सूत्र लक्षात ठेवायचं. एथनिक सजावट १) एथनिक सजावट करताना बैठकी खोलीचा पहिल्यांदा विचार करु या. या खोलीत भारतीय बैठक वापरा, यात शक्यतो लो सीटेड दिवाण (ज्याची उंची जमिनीला स्पर्श करणारी असते) ठेवा. आता तर थेट खाली नुसती गादी अंथरुन, त्यावर आकर्षक बेडशीट, पिलोज ठेवण्याचाही ट्रेण्ड आहे. लो सीट दिवाणानंतर कुशन्सवर पारंपरिक भरतकाम, ब्लॉक प्रिंट, जयपूरी प्रिंटचे पिलो कव्हर घाला. झालंच तर काश्मिरी गालिचा, सतरंजी दिवाणखान्याच्या मध्यभागी अंथरा. आणि हो, जागा असेलच तर भारतीय पद्धतीचा झुला हवाच! २) दिव्यांचा वापर करताना पारंपरिक पद्धतीचे कंदील दिवाणखान्यात टांगू शकता. ३) काही अॅण्टिक शो पीसेस ठेवूनही सजावट करता येते. कोनाडेंचा (पूर्वी भिंतींमध्येच फळ्या ठोकून किंवा आतील बाजूनं मोकळी जागा सोडून वस्तू ठेवण्यासाठी जागा बनवत) लूक हवा असेल तर लाकडी चौकडी भिंतीवर बसवून त्यात वस्तू ठेवता येतात. ४) मॉड्यूलर किचनच्या जमान्यातही भारतीय परंपरेची झलक किचनमध्येही दाखवता येते. त्यासाठी जुनी तांब्या-पितळाची, लाकडी भांडी असतील तर ती स्वच्छ करुन आकर्षकरित्या मांडून ठेवता येतात. . काही भांडी ठेवण्यासाठी लाकडी कपाटं स्वयंपाकघरात ठेवता येता. चटणी-मीठ सर्व्ह करण्यासाठी चिनी मातीची भांडी ठेवता येतात. ५) वेताच्या बास्केट्स, परड्या यांचा वापर डायनिंग टेबलवर फळं ठेवण्यासाठी करु शकता. मातीच्या माठावर, रांजणावर वारली पेंटिंग करुन त्यास आणखी आकर्षक बनवून मांडता येतं. ६) स्वयंपाकघराचं छत वूडन पॅनलचं बनवता येतं. ७) बाथरुममध्येही भारतीय परंपरेचा वारसा जपता येतो. आंघोळीकरिता तांब्याचं गंगाळं ठेवता येतं. कपडे अडकवायला लाकडी खुंटी आकर्षकरित्या लावता येतं. साबण, वॉशिंग पावडर ठेवण्यासाठी पारंपरिक डिझाईनचे लाकडी केबिन मस्त दिसतात. ८) बेडरुममध्ये पारंपरिक पद्धतीचा लाकडी, उंच, चार खांब असलेला पलंग ठेवून त्यावर झालर असलेले बेडशीट घालून बेडरूमला एथनिक लूक देता येतो. ९) जयपूरी प्रिंटचे पडदे, काही पारंपरिक सिल्कचे, हातमागावर विणलेले पडदे लावूनही या इ्थनिक लूकसाठीच्या पर्यायांमध्ये भर घालता येते.
मॉर्डन घरांना एथनिक टच द्यायचा कसा?
By admin | Published: April 10, 2017 4:46 PM