- मोहिनी घारपुरे - देशमुख
प्रेगण्ट आहोत तर आता कसली फॅशन. आता नुसते ढगळे कपडे. काय शोभतय याचा विचार कशाला करायचा? असा विचार करत असाल तर लगेच थांबा. थोडं फॅशनच्या जगात डोकावून पाहा.फॅशनच्या जगात आता गरोदर बायकाही किती फॅशनेबल कपडे घालतात हे बघून तुम्हालाही तुमच्या आवडीचे कपडे घालण्याची इच्छा होईल.गरोदरपणातही फॅशनेबल राहता येतं हेच खरं!
9 महिन्यांच्या या अवघडलेल्या अवस्थेतही सुंदर, आकर्षक दिसता येईल असे कपडे अलिकडे बाजारात उपलब्ध झाले आहेत. किंबहुना मॅटर्निटी वेअर असा एक वेगळा सेगमेंटच फॅशनच्या जगतात सुरू झाला आहे. तुम्हाला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी गर्भावस्थेत आरामदायक असे कपडे वापरण्याचा विचारही केला जात नसे. संपूर्ण 9 महिन्यांच्या कालावधीत अनेक स्त्रियांना सक्तीनं किंवा अन्य पर्याय नसल्यानं साडीच नेसावी लागत असे. त्यानंतर काही वर्षांपूर्वीपासून महिलांच्या पेहरावाला, पोषाखाला जरा स्वातंत्र्य मिळालं आणि काहीजणी पंजाबी ड्रेसेस किंवा गाऊन वगैरे घालून या दिवसात काहीसा आराम मिळवू लागल्या. अलिकडे मात्र बाळंतपण सुकर, अधिक सुंदर होण्यासाठी बाजारात आकर्षक कपडे दाखल झाले आहेत.
डंग्रीसारखा लुक असलेले नी लेंग्थ टॉप्स, काहीसे मोठ्या साईझचे, बंद गळ्याचे, झुळझुळीत कापडाचे कुर्ते, टॉप्स, मॅक्सी, पाँचो, स्कर्ट्स, ढगळ प्रिंटेड पँट्स, पार्टीवेअर लुक देणारे मॅटर्निटी वेअर असे शेकडो प्रकार, डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहेत. विशेषत: आॅनलाईन मार्केटमध्ये या प्रकारातील कपड्यांची मोठी रेंज आढळून येते. त्यामुळेच आता अवघडलेल्या अवस्थेतही अत्यंत आकर्षक, सुंदर आणि अपडेट दिसता येतं. तसंही या दिवसांमध्ये स्त्रीचं सौंदर्य आणखी खुलतं. शरीराचा बांधा सुडौल वगैरे राहत नसला तरीही चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच तेज येतं. संपूर्ण शरीराला बाळसं धरतं. सतत नऊ महिने आलेलं अवघडलेपण, जडत्व, वेदना यामुळे काहीशा चिडचिड्या झालेल्या महिलांना या दिवसात जर सुंदर, आकर्षक, आरामदायी, फॅशनेबल कपडे घालायला मिळाले तर त्यांचा एकंदर त्रास स्वत:कडे बघून निम्मा तरी कमी होईल असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच या दिवसांची मजा, आनंद मनमुराद लुटायचा असेल तर हलकीफुलकी फॅशन करा आणि फॅशनेबल दिसा.