भारतीय पालक मुलांच्या करिअरबद्दल सजग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:17 AM
मुलांच्या आयुष्यातील सगळ्याच बाबतीत आईवडील विशेष लक्ष देत असतात.
मुलांच्या आयुष्यातील सगळ्याच बाबतीत आईवडील विशेष लक्ष देत असतात. शाळेपासून ते लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीचा निर्णय ते घेत असतात. त्यामुळे मुलांच्या करिअरसारख्या महत्त्वाच्या बाबतीत पालक सजग नसतील तर नवलच वाटले असते. 'लिंक्डइन' या प्रोफेशनल वेबसाईटद्वारे करण्यात आलेल्यास एका सर्वेनुसार भारतीय पालक मुलांच्या करिअरची दिशा ठरविण्याच्या यादीत संपूर्ण जगामध्ये टॉप ३ मध्ये सामाविष्ट आहेत. ८२ टक्के भारतीय पालक मुलांच्या करिअरचा निर्णय घेण्यात सक्रिय भूमिका वठवतात. ब्राझीलमध्ये हेच प्रमाण ९२ टक्के तर चीनमध्ये ८७ टक्के आहे. एवढेच नव्हे तर जगाच्या (७७ टक्के) तुलनेत ८४ टक्के पालकांनी सांगितले की, मुले दिवसभर काय करतात याबाबतील त्यांना पूर्ण माहिती असते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४४ टक्के प्रोफेशनल्सनी मान्य केले की, त्यांच्या पालकांनी करिअरबद्दल खूप योग्य मार्गदर्शन केले तर १८-३४ वयोगटातील तरुण व्यावसायिकांनी सांगितले की त्यांनी विद्यापीठामध्ये कोणता कोर्स करावा याचादेखील निर्णय पालकांशी सल्लामसलत करून घेतला.