‘इन्स्ट्रक्टेबल्स’ अॅप देईल कलागुणांना चालना !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2017 5:27 PM
आपल्या अंगी असलेले कलागुण, कलाकौशल्य सादर करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. याउलट स्वत:च्या ज्ञानात भर टाकण्यासाठी नाविण्यपूर्ण गोष्टी पाहण्याची बहुतेकजणांना इच्छा असते.
आपल्या अंगी असलेले कलागुण, कलाकौशल्य सादर करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. याउलट स्वत:च्या ज्ञानात भर टाकण्यासाठी नाविण्यपूर्ण गोष्टी पाहण्याची बहुतेकजणांना इच्छा असते. नेमकी हीच निकड लक्षात घेऊन ‘आॅटोडेस्क’चे ‘इन्स्ट्रक्टेबल्स’ हे अॅप सादर झाले असून, यात नवीन गोष्टी शिकण्याची आणि तुम्ही केलेली नाविन्यपूर्ण गोष्ट जगासमोर ठेवण्याची संधी आपणास मिळते, तेसुद्धा संपूर्णपणे विनामूल्य. उदाहरणार्थ आपणास मोत्यांचे दागिने, माळा किंवा ब्रेसलेट कसे बनतात हे पाहायचे आहे, यासाठी सर्चबारमध्ये योग्य ते शब्द टाका. त्याच्याशी संबंधित असलेले सर्च रिझल्ट येथे दिसतील. त्यातील आवडलेले डिझाईन निवडल्यास त्या प्रकारची कलाकृती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, प्रत्येक टप्प्याची कृती फोटोसहित वाचायला मिळेल. काही ठिकाणी संपूर्ण कृतीचे व्हीडिओदेखील उपलब्ध आहेत.याठिकाणी हस्तकला व्यतिरिक्त तंत्रज्ञानासंबंधीदेखील कृती उपलब्ध आहेत. जसेकी लॅपटॉपच्या जुन्या बॅटरीजचा उपयोग करून पॉवरबँक तयार करणे. रासबेरी-पाय मायक्रो संगणक वापरून केलेली प्रोजेक्ट्स. रुबिक्स क्यूब सोडवणारा, ड्रॉइंग काढणारा, चेस खेळणारा रोबो बनवणे आणि यांसारखे इतर अनेक. तसेच नाविन्यपूर्ण केक्स, पास्ता, सॅलड्स, कॉफीचे वेगवेगळे प्रकार आदी पाककृती करून केलेले वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी माहिती येथे उपलब्ध आहे. शिवाय आपण स्वत: बनवलेली कलाकृती, पाककृती, एखादे कॉम्प्युटर अॅप, विज्ञानातील एखादा प्रयोग आदी लोकांपर्यंत शेअर करायचे असल्यास येथे अपलोड करु शकता. यासाठी आपणास मुख्य पेजच्या वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या कॅमेऱ्याच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर प्रोजेक्टला नाव देऊन त्याचा प्रकार, उपप्रकार इत्यादी निवडायचा असतो. त्यानंतर प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेले फोटो, व्हिडीओज आणि इतर फॉरमॅटमधील फाइल्स जसे की, फाइल्स वगैरे अपलोड करता येतात. आवश्यक असलेल्या सर्व स्टेप्स येथे टाइप करून तुमचे प्रोजेक्ट या साइटवर प्रसिद्ध करता येते. सतत काही तरी नवीन करू इच्छिणाऱ्याना, आपले ज्ञान आणि कला इतरांसमोर मांडून त्याचा जास्तीत जास्त लोकांना वापर करता यावा अशी इच्छा असलेल्या सर्वांसाठी हे अतिशय प्रभावी माध्यम आहे.