- सारिका पूरकर- गुजराथी सौंदर्य म्हणजे काय असतं? गोरा रंग, दागिने, उंची वस्त्रं, महागडे क्रीम्स, लोशन फासून केलेला मेकअप नाही तर एका स्त्रीचं खरं सौंदर्य असतं तिचा आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासाचं तेज तिच्या चेहऱ्यावर खरी चमक आणतं. .पण अलीकडे सौंदर्य स्पर्धांच्या झगमगाटात, गोरेपणा देणाऱ्या क्रीम्सच्या जाहिरातींच्या जंजाळात सौंदर्याची ही व्याख्या पुसट होऊ पाहतेय. नखांपासून केसांपर्यंत, दातांपासून ओठांपर्यंत असं करत करत संपूर्ण शरीरावर शस्त्रक्र्रिया करवून घेत सौंदर्य खुलवण्याचा नाद जगभरातील युवतींना लागलाय. त्या नादात अनेकींनी जीव देखील गमावला आहे.
एक युवती मात्र या तथाकथित सौंदर्याच्या मृगजळामागे न धावता स्वत:ला जसं आहे तसं स्वीकारुन आनंदी, आत्मविश्वासाचं जीवन जगतेय. सौंदर्याची व्याख्या, परिभाषाच बदलू पाहत आहे. निसर्गानं नाकारलेल्या शारीरिक सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याच्या बळावर स्वत्व जपू पाहतेय...एवढंच नाही तर तिनं नुकतीच मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेची आॅडिशन दिलीय... भावी मिस युनिव्हर्स म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जात आहे... मलेशियाची इव्हिटा डेलमुण्डो हे त्या २० वर्षीय युवतीचं नाव आहे..जर निवड झाली तर इव्हिटा या स्पर्धेतील एक खास, आगळीवेगळी स्पर्धक ठरणार आहे. ते यासाठी की जन्मली तेव्हापासूनच इव्हिाटाच्या संपूर्ण शरीरावर लहान मोठ्या आकाराचे मस ( चामखीळ ) आहेत. हे मस तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर, हातावर, मानेवर तसेच शरीरावर इतरत्रही आहेत. त्यामुळे साहजिकच इव्हिटाचं सौंदर्य या मसमुळे काळवंडलं गेलं. ती विद्रूप दिसू लागली. लहानपणी शाळेत कोणीच तिच्याशी मैत्री करत नव्हतं. सगळे तिला कायम दूर लोटत असत. कोणी तिला ‘ मॉन्स्टर ’ तर कुणी ‘ चिप्समोअर’ म्हणून चिडवत असत. लहान वयात इव्हिटाला हे सर्व सहन करणं अवघड जात होतं. ती एकटी पडली होती. जशी ती मोठी होत गेली तसतसे शरीरावर असलेले हे मस तिच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या आड येऊ लागले. काही मसवर नंतर केसही यायला लागले. साहजिकच शरीरावरील हे मस इव्हिटासाठी खूप लज्जास्पद, अपमानास्पद होते.
इव्हिटा या लोकनिंदेला वैतागली होती. साहजिकच वयाच्या १६ व्या वर्षी इतर युवतींप्रमाणे तिनेही शस्त्रक्रिया करुन घेण्याचं ठरवलं. परंतु डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेमुळे तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं सांगितलं. सुंदर दिसण्याची इव्हिटाची उरलीसुरली आशाही मावळली होती.
इथून पुढे मात्र इव्हिटाला स्वत:मध्येच नवीन इव्हिटा गवसली. मी जशी आहे तशीच राहीन. मला जे शरीर निसर्गानं दिलय त्यावर प्रेम करेन असा आनंदी राहण्याचा कानमंत्र तिनं स्वत:लाच देऊन टाकला आणि खरोखर तिचं आयुष्य तिनं बदलून टाकलं. तिच्या आईनं तिला यासाठी भक्कम साथ दिली. आपल्या शरीरावरील मसचा तिने नंतर कधीही तिटकारा केला नाही. इन्स्ट्राग्रामवर तिनं पोस्ट केलेल्या सेल्फीजमधून तर तिचे एक आत्मविश्वासानं भरलेले, जगण्यावर भरभरुन प्रेम करणारे, उत्साहानं ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्वच समोर आलं आहे...४३,००० फॉलोअर्सही तिला लाभले आहेत. तिचा आत्मविश्वास पाहून अनेकजण प्रेरित झाले आहेत.
तर अशी ही इव्हिाटा छंद म्हणून गिटार वाजवते.यामुळे तिला आनंद तर मिळतोच शिवाय मन:शांतीही. लोकल कॅफेमध्ये ती पार्ट टाईम जॉबही करते. इव्हिटा ते सर्व करते जे इतर सुंदर मुली करतात. फरक एवढाच आहे की त्या सुंदर आहेत हे दाखविण्यासाठी करतात तर इव्हिटा मी जशी आहे तशीच सुंदर आहे हे सांगण्यासाठी धडपडतेय, तिच्यातील एक सेल्फमेड माणूस जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतेय.
‘मिस युनिव्हर्समध्ये सहभागी झाले तर आत्मनिर्भरता, आत्मसन्मान, आत्मविश्वास याविषयी आणि स्वत:विषयी मला काही सांगण्याची संधी मिळेल, संधी मिळाली तर छानच आहे, नाही मिळाली तर आणखीही खूप काही मला माझ्याविषयी सांगायचंय, जे मी नक्कीच सांगेन’ असा तिचा आत्मविश्वास आहे.