धुम्रपान करणाऱ्या बेरोजगारांना नोकरी मिळणे कठिण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2016 9:56 PM
सिगारेटचे व्यसन नसणाऱ्या बेरोजगारांच्या तुलनेत त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता 30 टक्क्यांनी कमी असते.
सिगारेट ओढण्याचे कितीतरी दूष्परिणाम सांगता येतील. एवढे असुनही धुम्रपान करणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. सिगारेट सोडण्यासाठी जर आरोग्याचे कारण पुरेसे नसेल तर कदाचित नोकरीचे न मिळण्याचे कारण नक्कीच परिणामकारक ठरेल.एका स्टडीनुसार, जे लोक बेरोजगार आहेत आणि त्यांना सिगारेटचे व्यसनदेखील आहे, अशा लोकांना नोकरी मिळणे खूप कठिण असते सिगारेटचे व्यसन नसणाऱ्या बेरोजगारांच्या तुलनेत त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता 30 टक्क्यांनी कमी असते. आणि जर मिळालीच नोकरी तर पगारसुद्धा कमी असतो.कॅलिफोर्नियातील ‘स्टॅनफोर्ड प्रिव्हेन्शन रिसर्च सेंटर’च्या प्रमुख संशोधिका जुडिथ प्रोचस्का यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुम्रपानामुळे न केवळ शारीरिक हानी होते तर आर्थिकदृष्ट्यादेखील दूष्परिणाम होतात.त्या सांगातात, आरोग्याला सिगारेटी कशी घातक आहे याबाबत गेली पाच दशकांपासून माहिती आहे. परंतु आता सिगारेटचा जीवनातील इतर घटकांवरसुद्धा कसा परिणाम होतो हे समोर येत आहे.या संशोधनामध्ये 251 बेरोजगारांचा 2013 ते 2015 दरम्यान अभ्यास करण्यात आला. त्यांपैकी 131 लोक रोज सिगारेट ओढत तर 120 लोकांना धुम्रपानाचे व्यसन नव्हते. एका वर्षांनंतर व्यसन नसलेल्या 56 टक्के लोकांना नोकरी मिळाली तर स्मोकर्सनापैकी 27 टक्के लोकांना जॉब मिळवण्यात यश आले.