पासवर्ड गुपित ठेवाच !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2017 4:17 PM
बऱ्याचदा आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरताना पासवर्ड किंवा पिन इतरांना सहजपणे सांगतो. मात्र हे अत्यंत धोक्याचे असून, आपली मोठी फसवणूक होऊ शकते. सध्या कॅशलेसचे वारे वाहू लागले असून, पासवर्ड किंवा पिन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.
बऱ्याचदा आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरताना पासवर्ड किंवा पिन इतरांना सहजपणे सांगतो. मात्र हे अत्यंत धोक्याचे असून, आपली मोठी फसवणूक होऊ शकते. सध्या कॅशलेसचे वारे वाहू लागले असून, पासवर्ड किंवा पिन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. सध्या जवळपास प्रत्येक व्यवहाराच्या वेळी आपल्याला पासवर्ड किंवा पिन लागतोच. उदाहरणार्थ, आपण क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून दुकानात खरेदी केली किंवा पेट्रोल भरले, तर तिथल्या माणसाने आपले कार्ड त्याच्याकडच्या यंत्रामध्ये ‘स्वाइप’ केल्यानंतर आपल्याला आपला ‘पिन’ भरावा लागतो. बऱ्याचदा लोक आपला ‘पिन’ सरळ त्या माणसालाच सांगतात आणि तो माणूस आपल्या वतीने त्या यंत्रात आपला ‘पिन’ भरतो. हे अत्यंत धोकादायक आहे. याचे कारण म्हणजे आपल्या कार्डावरचे तपशील अशा ठिकाणी काम करणारा चाणाक्ष माणूस लक्षात ठेवू शकतो. याच्या जोडीला आपण आपला ‘पिन’ ही त्याला सांगितला, तर आपल्या कार्डाची सुरक्षितता पूर्णपणे नष्ट होऊ शकते. तो माणूस या सर्व माहितीच्या आधारे आपल्या कार्डाचा गैरवापर करू शकतो. हाच प्रकार फोनवरूनही घडतो. सर्वसामान्य लोकांना भामटे फोन करून त्यांच्याकडून एटीएम किंवा डेबिट वा क्रेडिट कार्डांचे तपशील, पिन, मोबाईलवर येणारे वन टाइम पासवर्ड (ओटीपी) अशी माहिती घेतात. यासाठी आपण बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी ते करतात; किंवा फोनवरून पलीकडच्या माणसाला कसले तरी बक्षीस लागले असल्याची आणि त्यासाठी ही माहिती आवश्यक असल्याची थाप मारतात. लोक भीती किंवा हाव यापोटी ही माहिती सहजपणे देतात. अशाने आपली मोठी फसवणूक होऊन पश्चातापाची वेळ येते हे नक्की. यासाठी आपला पासवर्ड, पिन आणि ओटीपी कधीही, कोणालाही सांगू किंवा दाखवू नका.