- माधुरी पेठकरआपण आपल्यासाठी जे कपडे निवडतो, जे अलंकार आपण घालतो, जो मेकअप करतो .. या प्रत्येक गोष्टी आपल्याबद्दल सांगत असतात. या सर्व गोष्टी आपण करायच्या म्हणून करत नाही. त्यामागे एक विचार असतो. अर्थात हा विचार प्रसंग, घटना यानुसार फॅशन करताना बदलत असतो. कारण प्रत्येक वेळी एकच फॅशन करून कसं चालेल?
हे जरी खरं असलं तरी खादीची फॅशन अशी आहे जी प्रत्येक प्रसंगात शोभून दिसते आणि उठूनही दिसते.
खादी ही फॅशनच्या इतिहासातील जुनी फॅशन. पण आत्ताच्या फॅशनच्या जगात खादी ही एव्हरग्रीन झाली आहे. खादी जुनी नसून ती प्रत्येकवेळेस नवेपणाची झालर घेवून येते. शिवाय खादी वापरल्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. सिम्पल, सोबर आणि तरीही आकर्षक दिसण्याचा पर्याय खादीनं उपलब्ध करून दिलाय.
खादी ही फक्त उन्हाळ्यातच वापरली जाते. यासारखे अनेक समज खादीला चिटकलेले असले तरी खादी या सर्व समजांच्या पलिकडची आहे.किंबहुना सर्व समजांना पुरून उरणारी आहे. कोणत्याही ॠतुत आणि कोणत्याही सणाला प्रसंगाला खादी शोभून दिसते हेच खरं.
खादी म्हटलं की प्लेन असंच चित्र डोळ्यासमोर उभं राहात असलं तरी खादीचे कपडे आता फुलांच्या डिझाइनमध्ये, ब्लॉक प्रिंटिंगमध्ये उपलब्ध आहे. खादी म्हणजे फक्त सलवार कुर्तीज किंवा साडीच नाही तर शर्ट-पॅण्ट आणि स्कर्टवरही खादी शोभून दिसते.
खादीचा मॉर्डन अंदाज कोणालाही कॉपी करून पाहावा असाच. खादीचे क्रॉप टॉप आणि रॅप अराऊण्ड स्कर्ट ही फॅशन तर भाव खावून जाते.
साड्यांंमध्येही खादीची साडी वेगळच स्टाइल स्टेटमेण्ट करते. वेगवेगळ्या रंगामध्ये खादीच्या साड्या उपलब्ध आहे. मॉर्डन लूकसाठी जरदोसीच वर्क केलेली आणि ब्लॉक प्रिण्ट असलेली खादीची साडी निवडावी. खादीची प्लेन साडी निवडणार असाल तर ब्लाऊज मात्र हेवी एम्ब्रॉयडरी असलेलं शिवावं.
खादीचे कुर्ते आणि त्याखाली सलवार किंवा लेगिन्स किंवा जिन्स काहीही शोभून दिसतं. कुर्ता खादीचा असला की इतर कोणत्या गोष्टीकडे कोणाचं लक्षच जात नाही.
खादीच्या कुर्तीजवर भडक रंगाची ओढणी घ्यावी. ओढणी जर भडक रंगाची असेल तर खादीचा कुर्ता हा गडद रंगाचा निवडू नये. ओढणी आणि खादीच्या कुर्तीचं कॉंन्ट्रास्ट कॉम्बिनेशन असेल तरच ते उठून दिसतं.