ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - धूम्रपान करणं आरोग्यासाठी प्रचंड हानिकारक आहे. यामुळे शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शिवाय, आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. एका अहवालानुसार, धूम्रपानाच्या कारणामुळे भारतामध्ये लाखोंच्या संख्येनं लोकं मृत्यूमुखी पडतात.
तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवन केल्यामुळे विविध आजार जडतात. आधी खोकला, श्वास घेण्यात अडचणी असे विकार होतात. पुढे हृदयविकार, कर्करोगासारखे आजार बळावतात. अनेकांचं असे म्हणणे आहे की त्यांना धूम्रपान सोडायचे आहे मात्र त्यांची सवय काही केल्या सुटत नाही. त्यामुळे धूम्रपान सोडवण्यासाठी काही खास उपाय आहेत, ज्या तुम्ही दैनंदिन आयुष्यात वापर केला तर तुमची धूम्रपानाची सवय नक्कीच सुटण्यास मदत होईल.
- अल्पोपाहार (Snacks)
साधारणतः धूम्रपान करणारी माणसं अधिक वेळापर्यंत धूम्रपान करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. जर तुम्ही धूम्रपान करत असला आणि धूम्रपान करण्याची तुमची इच्छा होत असल्यास शेंगदाणे, पॉपकॉर्न किंवा सुका खाऊ तुम्ही खाऊ शकता. शिवाय तुम्ही डॉक्टरांचाही सल्ला घेऊ शकता.
- च्युईंगम
च्युईंगमदेखील धूम्रपान सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जेव्हा तुम्ही च्युईंगम चघळता तेव्हा तुमचे लक्ष धूम्रपान करण्याकडे जात नाही. तसेच च्युईंगममुळे शरीरावर कोणताही परिणाम होत नाही.
- चॉकलेट
असे म्हटले जाते की चॉकलेटमुळे धूम्रपान करण्याची समस्या सुटू शकते. डार्क चॉकलेटचे सेवन शरीरासाठीदेखील चांगले मानले जाते. मात्र, धूम्रपान सोडवण्यासाठी मिल्क चॉकलेट खाणं आरोग्यासाठी योग्य ठरणार नाही.
- फळं खा
धूम्रपानामुळे शरीराला आवश्यक असलेल्या "क" जीवनसत्वाचा पुरवठा खंडित होतो. धुम्रपान टाळण्यासाठी संत्री, लिंबू आणि डाळींब अशा फळांचे सेवन करावे. त्यामुळे "क" जीवनसत्वाची कमतरता भरून निघेल. संत्र्याच्या रसामुळे धूम्रपानाची सवय लवकर सुटू शकते.
- दालचिनी बारीक वाटून मध व दालचिनी असे चाटण करावे, जेव्हा जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा होईल तेव्हा हे चाटण चाटावे
धूम्रपान सोडवण्यासाठी अनेक जण निरनिराळ्या पद्धती आणि औषधांचं सेवन करण्याचा सल्ला देतात. मात्र यासाठी औषधांचं सेवनदेखील आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही औषधांचं सेवन करणं टाळा.