- माधुरी पेठकरथंडीत हमखास आठवतात ते मेथीचे लाडू. मेथ्यांचा कडवटपणा, गुळाचा गुळमटपणा, डिंकाचा खुसखुशीतपणा आणि सुक्यामेव्याची पौष्टिकता यागुणांनी संपन्न मेथीचे लाडू सगळ्यांनाच आवडतात. मेथ्यांचा कडूपणा मान्य करूनही हे लाडू आवडीनं आणि आवर्जून खाल्ले जातात. पण मेथ्यांचा उपयोग फक्त लाडवापुरताच मर्यादित नाही. या मेथ्या शरीरास जेवढ्या फायदेशीर तितक्याच सौंदर्योपचारातही परिणामकारक ठरतात. केसांच्या अनेक समस्यांवरचा प्रभावशाली उपाय मेथ्यांमध्ये सापडतो.
वेगवेगळ्या कारणांमुळे केस पातळ होणं, कोरडे होणं, कोंडा होणं यासारख्या केसांच्या समस्या वाढल्या आहेत. या समस्यांचे उपाय मेथ्यांच्या दाण्यात आहेत. उगाच बाजारातले प्रोडक्टस वापरून केसांची नासाडी करण्यापेक्षा घरगुती उपायांनी समस्या तर सुटतातच शिवाय केसांची गुणवत्ताही वाढते,.
केसांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि केस नैसर्गिकपणे सुंदर करण्यासाठी मेथ्य्यांचा चांगला उपयोग होतो. मेथ्यांमध्ये फोलिक अॅसिड, अ, के आणि क जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतं. पोटॅशिअम, कॅल्शियम, लोह यासारखी खनिजंही मेथ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या गुणांमुळेच मेथ्या जर केसांसाठी वापरल्या तर केसांचा कोरडेपणा, कोंडा यासारख्या समस्या सहज जातात. मेथ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लेसिथिन नावाचा घटक असतो ज्यामुळे केस कोरडे होत नाही. केसांची मुळं मेथ्यांमुळे पक्की होतात.मेथ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन, निकोटिनिक अॅसिड असतं याचा उपयोग केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो. मेथ्या या उष्ण गुणधर्माच्या असतात. ही उष्णता कमी करून केसांसाठी त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर मेथ्या या रात्रभर पाण्यात भिजत ठेवाव्यात. यामुळे मेथ्यांमधील उष्णता कमी होते. मेथ्यांमध्ये केसांच्या आरोग्यास पुरक असे अॅण्टिआॅक्सिडण्टस असतात.
केस गळती थांबवण्यासाठीकेस गळतीवर उपाय म्हणून मेथ्यांचा लेप लावावा. यासाठी दोन चमचे मेथ्या रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात.नंतर सकाळी त्या वाटून घ्याव्यात. मेथ्यांची ही पेस्ट केसांचं उत्तम संरक्षण करते. ही पेस्ट केसांना लावावी. वीस मिनिटं ती केसांवर राहू द्यावी. केस धुण्याआधी हलक्या हातानं केसांच्या मुळाशी मसाज करावा. आणि सौम्य शाम्पूनं केस धुवावेत. जर केसात कोंडा असेल तर मेथ्यांच्य पेस्टमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळावा. या पेस्टमुळे कोंडा जातो. जर केस मऊ हवे असतील तर या पेस्टमध्ये 1 चमचा नारळाचं दूध घालावं.
काळ्याभोर आणि मऊसूत केसांसाठी
दोन चमचे मेथ्या घ्याव्यात. त्या मिक्सरध्ये वाटाव्यात. मेथ्यांच्या पूडमध्ये एक चमचा खोबरेल तेल किंवा आॅलिव्ह तेल घालावं. ती पेस्ट चांगली एकजीव करून घ्यावी. नंतर ती केसांना लावावी. दहा मिनिटं ती केसांवर तशीच राहू द्यावी. नंतर सौम्य शाम्पूनं केस धुवावेत. मेथ्यांचा हा उपचार नियमित केल्यास केस उत्तम राहातात. केसांच्या सौंदर्यासाठी ब्युटी पार्लरची गरज नाही. घरात मेथ्यांचे दाणे असले तरी पुरते.