‘लव्ह अॅट फर्स्ट साईट’ खरं की खोटं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2016 10:04 AM
पहिल्या भेटीत/नजरेत नाही तर चौथ्या भेटीत खऱ्या अर्थाने प्रेमाला सुरूवात होते.
पहिल्याच नजरेत प्रेम खरंच होऊ शकतं का? चित्रपटांमध्ये कसं, हीरो हीरोईनला पहिल्यांदाच पाहतो आणि म्हणतो की, करेन तर हिच्याशीच लग्न करेन. केवळ एकाच नजरेत कसं कळतं की हे आपले प्रेम आहे? याचाच शोध घेण्यासाठी संशोधकांनी एक प्रयोग करून पाहण्याचे ठरवले. त्यातून असे समोर आले की, पहिल्या भेटीत/नजरेत नाही तर चौथ्या भेटीत खऱ्या अर्थाने प्रेमाला सुरूवात होते.अमेरिकेतील हॅमिल्टन कॉलेजमधील संशोधकांनी तरुण मुलामुलींच्या एका गटाला काही लोकांच्या चेहऱ्यांचे फोटो दाखवले. या मुलामुलींच्या मेंदूमध्ये कशी प्रतिक्रिया उमटते हे पाहण्यासाठी त्यांना सेन्सर्सदेखील लावले. फोटोपाहून त्यांना फोटोतील व्यक्तीच्या आकर्षकपणाबद्दल गुण देण्यास सांगितले. तेच फोटो दुसऱ्या वेळेस दाखवले तेव्हा त्यांना ते जास्त आकर्षक वाटले. तिसऱ्यावेळेस त्याहूनही अधिक आणि चौथ्यावेळेस दाखवल्यावर मेंदूच्या उत्साह आणि आनंदाच्या भागात सर्वाधिक हालचाल दिसून आली.मानसशास्त्रज्ञ रवी थिरुचेसेल्वम यांनी सांगितले की, पहिल्याच नजरेत किंवा भेटीत आकर्षण निर्माण होऊ शकते मात्र त्या आकर्षणाचे प्रेमात रुपांतर होण्यासाठी पुढे भेटीगाठी होणे आवश्यक असते. आमच्या प्रयोगांतून दिसून आले की, चौथ्या भेटीनंतर प्रेमाला सुरुवात होते. म्हणजे प्रेमाच्या बाणाने घायाळ होण्यासाठी केवळ ‘एक नजर काफी नहीं.’