युअर टर्न नाऊ मोहीमेतंगर्त दिला जातोय प्रेमाचा संदेश!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2017 12:37 PM
हे जग जगण्यासाठी सुंदर ठिकाण व्हावं यासाठी ऋषभने युअर टर्न नाऊ ही मोहीम सुरु केली आहे.
काही वर्षापूर्वी 'जय हो' सिनेमात ''अगर आपको लगता है मैने आपकी हेल्प की है तो थँक यू मत, कहिये तीन लोगोंकी हेल्प कीजिये'' सलमान खानचा हा डायलॉग खूप प्रसिध्द झाला होता. त्यानुसार प्रत्येकजण थँक यू म्हटल्यानंतर सलमानचा हाच डायलॉग म्हणताना दिसायचे.तसेच ''आली रे आली'' आता तुझी बारी आली, 'सिंघम' सिनेमातला हा डायलॉग सा-यांच्या परिचयाचा झालाय.तुझी बारी म्हणजेच तुझी वेळ आलीय असा या डायलॉगचा नकारार्थी अर्थ आहे.मात्र आता हे जग राहण्यासाठी सर्वात सुंदर ठिकाण बनवण्याची बारी किंवा वेळ तुमच्यावर येऊ शकते.कारण हे जग वास्तव्यासाठी सर्वांग सुंदर ठिकाण व्हावं या ध्येयानं एका तरुणाला पछाडलं आहे. मुंबईतला हा तरुण असून त्याचे नाव ऋषभ तुराखिया असं आहे. हे जग जगण्यासाठी सुंदर ठिकाण व्हावं यासाठी ऋषभने युअर टर्न नाऊ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमे अंतर्गत तुम्हाला फार कष्ट करावे लागत नाही. तुमच्या परिचयात नसलेल्या, तुमचे सहकारी किंवा ओळखीच्या व्यक्ती यांच्यासाठी तुम्ही मदतीचा हात सरसावता तेव्हा युअर टर्न कार्ड पुढे जाते. त्या व्यक्तींनी मग त्यांच्या ओळखीच्या, किंवा ओळखीच्या नसलेल्या व्यक्तींसाठी मदतीचा हात सरसावला की ही एक साखळी बनू लागते. एखाद्याला गरज असताना प्रेम, दया देणे म्हणजेच युअर टर्न नाऊ कार्ड पुढे सरसावणे. एका छोट्याशी कृतीतून अनेक हसतमुख आणि समाधानी चेहरे, त्यांच्या चेह-यावरील भाव पाहायला मिळणे हेच या मोहीमेच्या यशाच्या दिशेने वाटचाल आहे.ही जागतिक चळवळ डिसेंबर 2009 पासून सुरु झाली. आयुष्यात एकदा तरी 7 अब्ज लोकांच्या माध्यमातून ही मोहीम पुढे नेणे असे उद्दीष्ट आहे. आजवर जवळपास सव्वाचार लाख व्यक्तींनी आपल्या कृतीतून किंवा वागण्यातून प्रेम, माया स्वतःकडून दुस-यापर्यंत पोहचवली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच जात आहे. इंग्रजी, हिंदी, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, अरबी, रशियन अशा नऊ विविध भाषांमधून आणि प्रेमाचा संदेश जगभर पसरवला जात आहे. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, सिंगापूरसह जगातील 39 देशांमध्ये ही युअर टर्न नाऊ ही मोहीम पोहचली आहे. लार्सन एंड टुर्बो, एमटीएनएल, टीसीएस, मॅक्स इंडिया, ऍक्सिस बँक, प्रिन्स इंडिया सारख्या कॉर्पोरेट कंपन्यांनीसुद्धा प्रेमाचा संदेश देण्यासाठी आपापल्या संस्थांमध्येमध्ये ही मोहीम राबवलीय. याशिवाय भारतातील अनेक शाळांनीसुद्धा ही जगाला प्रेम अर्पण करण्याच्या मोहीमेत हिरहिरीने सहभाग घेतलाय. अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे, हिल स्प्रिंग इंटरनॅशनल, कॅथेड्रल स्कूल, बॉम्बे इंटरनॅशनल स्कूल, धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, सिंगापूर इंटरनॅशनल, बिलाबाँग इंटरनॅशनल अशा शाळांनीही या मोहीमेच्या यशासाठी पुढाकार घेतलाय. या शाळांकडून विविध उपक्रम राबवले जातात. या मोहिमेत तुम्हीसुद्धा सहभाग घेऊ शकता. यासाठी कुठलाही खर्च तुम्हाला करावा लागत नाही. फक्त प्रेमाचा संदेश तुम्हाला पुढे न्यायचा आहे. युअर टर्न नाऊ कार्डसाठी लॉग इन करा www.yourturnnow.in वर किंवा संपर्क करा +919029602897 या नंबरवर. चला तर मग सानेगुरुजींच्या ओळींना सार्थ ठरवूया, खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे.