महेश मांजरेकर एक ‘अफलातून’ व्यक्तिमत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2016 6:29 AM
मराठी चित्रपट इंडस्ट्रिच्या इतिहासात ‘नटसम्राट’ च्या रुपाने बॉक्स आॅॅफिसवर पहिल्यांदाच ४० कोटींचा गल्ला मिळवून देणाऱ्या आणि मराठी इंडस्ट्रिला अनेक दैदिप्यमान शिखरं दाखविणाऱ्या महेश मांजरेकर नावाच्या ‘बाप’ माणसाला हे नवं विशेषण म्हणजे अतिशयोक्ती नव्हे.
मराठी चित्रपट इंडस्ट्रिच्या इतिहासात ‘नटसम्राट’ च्या रुपाने बॉक्स आॅॅफिसवर पहिल्यांदाच ४० कोटींचा गल्ला मिळवून देणाऱ्या आणि मराठी इंडस्ट्रिला अनेक दैदिप्यमान शिखरं दाखविणाऱ्या महेश मांजरेकर नावाच्या ‘बाप’ माणसाला हे नवं विशेषण म्हणजे अतिशयोक्ती नव्हे. १९८४ साली ‘अफलातून’ या नाटकाद्वारे आपली अभिनय कारकीर्द सुरु झाल्यानंतर केवळ मराठीत नव्हे, तर हिंदी, तामिळ, तेलगु, चित्रपटांमधून आपल्या जबरदस्त अभिनयाचा प्रभाव पाडणारा अभिनेता नेमका आहे तरी कसा? याचं कोडं भल्या-भल्यांना उलगडत नाही. महेश मांजरेकरांची पत्नी मेघा मांजरेकर या महेश बद्दल बोलताना म्हणाल्या, महेश वरवर कठोर वाटतात, पण आतून खूप चांगले व मृदु आहेत...म्हणजेच नारळ जसे वरुन टणक आणि आतून गोड असते. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती या तिन्ही क्षेत्रांना कोळून पिलेला हा अवलिया खरच असाच आहे.बिनधास्त तरीही सावध, फटकळ तरीही अभ्यासू, कठोर तरीही संवेदनशिल. हे सर्व विरोधाभासी गुण महेश मांजरेकरांसोबत काम करणाºयांना पदोपदी जाणवतात. ‘नटसम्राट’ च्या शूटिंगच्या वेळी दस्तुरखुद्द ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांना देखील याचा प्रत्यय आला. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रत्येक क्षेत्रात लीलया वावरणारे महेश मांजरेकर हिंदीतल्या आमिर खान प्रमाणेच मि. परफेक्शनिस्ट आहेत. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात उभे केलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि नुकत्याच येऊन गेलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ मधील छत्रपती शाहू महाराजांचं पात्र असो, महेश मांजरेकर प्रत्येक भूमिका इतक्या समरसतेने आणि जीव ओतून करतात, की ते पाहून असं वाटतं की, महेश मांजरेकरांशिवाय त्या भूमिकेत कुणीच फिट बसलं नसतं. त्यांच्या वाट्याला जे ग्लॅमर मिळाले,त्यामागे महेश मांजरेकर यांची प्रचंड मेहनत आहे. आजवर अनेक राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाली, स्क्रीन पुरस्कार मिळाले. मात्र या सर्वांच्या पुढे जाऊन महेश मांजरेकर मराठी पुरस्कार सोहळ्याची शान असतात. त्यामुळेच महेश मांजरेकर एक ‘अफलातून’ व्यक्तिमत्त्व आहे.