- मोहिनी घारपुरे-देशमुखमेकअप पार्टी. आश्चर्य वाटलं ना हे वाचून . मेकअप पार्टी अशी कधी पार्टी असते का? असा प्रश्न पडून मनातल्या मनात हसायलाही आलं असेल. पण पाश्चात्य देशांमध्ये मेकअप पार्टी नावाचं एक मस्त कल्चर आहे. एरवी वाढदिवस, लग्नाचा वाढिदवस वगैरेच्या निमित्तानं पार्टीचं आयोजन केलं जात असतंच. परंतु, एखाद्या टिपिकल गर्ल्स नाईट आऊटला जोडून तुम्हीही अशी एखादी मेकअप पार्टी थ्रो करू शकता. ही मेकअप पार्टी घरातल्या घरात आयोजित करू शकता किंवा एखाद्या झक्कासशा लोकेशनवर ही पार्टी देता येते. एकदा तुमच्या मैत्रिणींसोबत ही आयडिया शेअर करून बघा. एकत्र मिळून आणखी नवनवीन आयडिया सूचतील.
मेकअप पार्टी अशी करा!
मेकअप पार्टी तुमच्या किंवा एखाद्या मैत्रिणीच्या घरी आयोजित करू शकता. मस्त सजवलेल्या एखाद्या खोलीत मेकअप रूम तयार करून तिथे लाईट इफेक्ट आणि आरसे सज्ज ठेवा. खिडक्यांना पडदे, हँगर्स आणि टेबल्स किंवा सामान ठेवायला कॉर्नर्स असायलाच हवेत.तुमच्या मैत्रिणींना पार्टीसाठी आमंत्रित करा. येताना त्यांना त्यांच्याजवळील मेकअपचं सामान घेऊन यायला सांगा म्हणजे तुम्हाला मेकअपचं सामान एकमेकींशी शेअर करता येईल. किंवा तुम्ही एखाद्या ब्यूटीपार्लरमधील सौंदर्यसेवा पुरविणार्या प्रशिक्षित महिलेलाही योग्य त्या मोबदल्यावर पार्टीत बोलावू शकता. तिच्याकडून प्रत्येकजण आपापला मेकअप करून घेऊ शकेल. विशेषत: एखाद्या मैत्रिणीच्या लग्नाला जाण्याच्या आदल्या दिवशी किंवा सण समारंभाच्या एखाद दोन दिवसआधी मेकअप पार्टी आयोजित करणं अधिक उत्तम ठरेल. त्याचबरोबर आणखी काही वेगळं करायचं असेल तर इंटरनेटवर मेकअप पार्टीकरिता अनेक आयडिया तुम्हाला सापडू शकतील.हलक्या फुलक्या पदार्थांची ट्रीट
या पार्टीसाठी स्नॅक्स आयटम आणि सॉफ्ट ड्रिंक्स ठेवता येतात. अधून मधून तोंडात टाकायला चॉकलेट्स आणि ड्रायफ्रूट्स एका डिशमध्ये ठेवावेत. पिझ्झा वगैरे या पार्टीसाठी शक्यतो नकोच. त्याऐवजी मेकअपचा आनंद घेत घेत खाता येईल असे एखादे रॅप, चीज रॅप, पोटॅटो रॅप आणि रोल्स वगैरे ठेवता येतील. तुम्ही नॅचरल मेकअप ट्राय करणार असाल तर नॅचरल फूड म्हणजे फळं आणि सलाड ठेवलं तरीही चालेल.सोबतीला हळूवार संगीत
या पार्टीसाठी सूदींग म्यूझिक अत्यावश्यक आहे. मेकअप करताना तो अनुभव मनाला आनंद देणारा असावा यासाठी मंद स्वरातलं हळुवार संगीत खोलीत लावून ठेवा. एकमेकींना मेकअप करताना पाहाणंही मनाला खूप शांतता देणारं असतं.
मेकअप पार्टी करताना ही काळजी घ्या..* मेकअपचं सामान एकमेकींशी शेअर केलं, एकमेकींचं वापरलं तरी चालेल मात्र मेकअपकरिता वापरण्यात येणारे ब्रशेस मात्र आपापलेच वापरावेत, कारण एकमेकींचे ब्रशेस वापरल्यानं बॅक्टेरिअल इन्फेक्शन वगैरे पसरण्याची शक्यता असते.यातून त्वचेचे आजार होवू शकतात.
* लिपस्टिक्स देखील शक्यतो सेपरेटच ठेवा. उत्सुकतेपोटी एकमेकींच्या लिपस्टिक्स ट्राय करून पाहाणं टाळलेलंच बरं. कारण लिपस्टिक ही ओठांवर लावायची असल्यानं ती पर्सनलच असली पाहिजे. मात्र, एखादी शेड आवडली तर ती लावून पाहण्याचा मोह टाळणं शक्य होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला किंवा तुमच्या मैत्रिणींना एखादीची लिपस्टिकची शेड आवडली तर ती जिनेतिने आपापल्या ब्रशच्या सहाय्यानं आपल्या ओठावर लावायला हवी. डायरेक्ट लिपस्टिक लावली तर एकमेकींना इनफेक्शन होण्याची दाट शक्यता असते.
* कोणतेही नवीन प्रॉडक्ट थेट अप्लाय करण्यापूर्वी ते आपल्या त्वचेला सूट होत आहे की नाही याची चाचणी करून पाहा. शेअरिंग करताना मैत्रिणीकडचं कोणतंही प्रॉडक्ट ब्रॅण्डेड आहे की नाही ते तपासून मग त्याची कानाच्या मागच्या बाजूला किंवा हाताच्या कोपराच्या बाजूला चाचणी करून पाहा आणि सूट झाल्यानंतरच लावा.
* पार्टीनंतर होस्टनं खोलीची स्वच्छता करून घेणं अत्यावश्यक आहे हे लक्षात ठेवा. विशेषत: वॅक्स केलेल्या स्ट्रीप्स, ट्रीम केलेले केस वगैरे खोलीत कानाकोपर्यात पडलेले वेळच्यावेळी स्वच्छ करून घ्या. अन्यथा संपूर्ण घरभर ते पसरतील आणि अनारोग्य पसरू शकेल.