जुळ्यांचे आयुर्मान असते जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2016 12:44 PM
जुळे भावंड असणारे लोक जुळे भावंड नसणाऱ्या लोकांपेक्षा अधिक काळ जगण्याची शक्यता असते.
तुम्हाला कधी असं वाटते का की, तुमचा कोणी जुळा भाऊ किंवा बहीण असायला हवी? यामुळे नाही काही तर निदान जास्त आयुर्मानाचा तरी फायदा झाला असता. कारण नव्या संशोधनानुसार जुळे भावंड असणारे लोक जुळे भावंड नसणाऱ्या लोकांपेक्षा अधिक काळ जगण्याची शक्यता असते.आयुष्याच्या विविध टप्प्यावर जुळ्या भावंडाचे मृत्यूदर प्रमाण हे कमी आढळले. जुळे भावंड असेल तर व्यक्तीचे ‘सोशल कनेक्शन’ अधिक चांगले असते आणि त्याचा सकारात्मक परिणाम आरोग्यावर पडतो ज्यामुळे ते अधिक आयुष्य जगतात, असे संशोधकांना वाटते. वॉशिग्टन विद्यापीठाचे डेव्हिड शॅरो व चमूने हे संशोधन केले.अध्ययनासाठी ‘डॅनिश ट्विन रेजस्ट्री’तील माहितीचा अभ्यास करण्यात आला. जुळ्यांची माहिती ठेवणारा हा सर्वात जुना संग्रह आहे. डेन्मार्कमध्ये १८७० आणि १९०० या दरम्यान जन्मलेल्या व वयाच्या १० वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगलेल्या २९३२ जुळ्यांचा संशोधकांनी अभ्यास केला. या जुळ्यांच्या मृत्यूच्या वेळीचे वयाची डेन्मार्कमधील एकूण लोकसंख्येशी तुलना केली.पुुरुषांमध्ये जुळे भावंड असण्याचा सर्वाधिक लाभ वयाच्या चाळीशीत दिसून आला. म्हणजे सामान्य शंभर पुरुषांपैकी ८४ पुरुष वयाच्या ४५व्या वर्षीदेखील जिवंत असतील तर हेच प्रमाण जुळे असणाऱ्या लोकांमध्ये ९० असेल. महिलांमध्य मृत्यूदर घटण्याचे प्रमाण वयाच्या साठाव्या दशकात सर्वाधिक असते.