- मोहिनी घारपुरे - देशमुख
नखांसाठी पूर्वी अगदीच नखभर वेळ काढावा लागे. पण आता नुसती नखांना नेलपॉलिश लावून मजा येत नाही. नेल आर्टसारखं काही वेगळं केलं तरच भारी वाटतं. शाळेतल्या दिवसात नखं कापायची सक्ती आणि दुसरीकडे मोठं होताना लांब-लांब नखं वाढवण्याची हौस. हे असं प्रत्येकीच्याच बाबतीत होतं. पूर्वी ही लांब-लांब नखं फक्त वेगवेगळ्या रंगांची नेलपॉलिश लावून सुंदर करण्यावर भर दिला जात असे. अलिकडे मात्र नखांचं सौदर्य अधिक खुलवण्यासाठी नेल आर्टचा फंडा वापरला जातो. नेलआर्टमुळे नखं इतकी सुंदर दिसतात की अनेकजणींना नखांवर सतत काही ना काही आकर्षक आर्ट करून घेण्याचीच क्रेझ वाढू लागली आहे.
नेल आर्ट म्हणजे?काही वर्षांपूर्वी नखांना काहीही लावू नये ही पक्की धारणा होती. त्यानंतर नेलपॉलिश बाजारात आली आणि विशेषत: तरूणींना त्याचीच भुरळ पडली. लाल भडक रंगापासून ते कोणताही अन्य डार्क त्यांना पसंत असे. त्यानंतर सेक्सी, न्यूड कलर्सची चलती वाढली. मग ग्लिटरचे नेलपॉलिश बाजारात आले आणि त्यालाही प्रचंड रिस्पॉन्स मिळू लागला. आता हल्ली नेलआर्टच लोकप्रिय आहे. एका विशिष्ट ब्रशच्या सहाय्यानं नखं घासून त्यांना विशिष्ट आकार दिला जातो. त्यानंतर एक किंवा दोन वेगवेगळ्या शेड्स वापरून नखांना नेलपॉलिश लावलं जातं. त्यावर ग्लिटरचे नेलपॉलिश लावून स्टार्स, स्टोन्स किंवा रिंग्स देखील नखांमध्ये अडकवल्या जातात. नखं तुटू नयेत याची काळजी घेतली जाते. पार्टीला वगैरे जाताना त्या त्या पोषाखाप्रमाणे नखांना रंगवून अधिक आकर्षक केलं जातं.