आता स्मार्टफोनसाठी डिटॅचेबल की-बोर्ड येणार !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2016 5:01 PM
स्मार्टफोन यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी म्हणजे टायपिंगसाठी आता ‘डिटॅचेबल की-बोर्ड’ उपलब्ध होणार आहे. आपल्या टचस्क्रीन फोनला जोडता येण्यासारखा ‘टायपो की-बोर्ड’ अमेरिकेच्या रियान सीक्रेस्ट यांनी तयार केला आहे.
स्मार्टफोन यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी म्हणजे टायपिंगसाठी आता ‘डिटॅचेबल की-बोर्ड’ उपलब्ध होणार आहे. आपल्या टचस्क्रीन फोनला जोडता येण्यासारखा ‘टायपो की-बोर्ड’ अमेरिकेच्या रियान सीक्रेस्ट यांनी तयार केला आहे. हा की-बोर्ड फोनच्या खालच्या बाजूने जोडून ब्लूटूथद्वारा फोनला जोडता येतो. मागील बाजूने पाहिल्यास तो फोनचे कव्हर असल्यासारखा दिसतो. अॅपल फोनला हा की-बोर्ड जोडल्यास त्याची जाडी पाव इंचाने वाढते, तर लांबी एक इंचाने वाढते. ‘हे डिझाईन तयार करताना आम्ही टायपिंग करता येईल, फोनला संरक्षणही मिळेल व आयफोनची लांबी व जाडी कमीत कमी वाढेल, हा विचार प्रामुख्याने केला होता,’ असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. ‘आमचे काही मित्र टायपिंगसाठी एक फोन व दुसरा आयफोन इतर कामांसाठी वापरत होते. मी माझ्या मित्राबरोबर जेवायला बाहेर गेलो तेव्हा आमच्या टेबलवर दोन माणसे आणि चार फोन होते. यातूनच टायपो की-बोर्डची कल्पना सुचली,’ असे कंपनीच्या या प्रकल्पावरील संशोधकांनी स्पष्ट केले. हा की-बोर्ड आयफोनसाठी लॉंच केला आहे. मात्र भविष्यात अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनसाठीदेखील अशा प्रकारचे की-बोर्ड तयार करण्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे.