ओबामांची मुलगी करतेय हॉटेलात काम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2016 3:17 PM
खऱ्या जगाचा अनुभव घेण्यासाठी तिने सुट्यांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि ओबामांनीदेखील तिला प्रोत्साहन दिले.
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची लहानी मुलगी नताशा जिला सर्व जण लाडाने साशा म्हणतात, ती सध्या उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये एक हॉटेलात काम क रत आहे. पंधरा वर्षीय साशाचे निम्मे आयुष्य व्हाईट हाऊसच्या सुरक्षित आणि ऐशोआरामात गेले आहे. खऱ्या जगाचा अनुभव घेण्यासाठी तिने सुट्यांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि ओबामांनीदेखील तिला प्रोत्साहन दिले.मार्थाज् विनयार्डवर स्थित प्रसिद्ध ‘नॅन्सीज्’ हॉटेलात साशा टेक-अवे आॅर्डर घेण्याचे काम करते. नुकतेच तिचा युनिफॉर्म (निळ्या रंगाचा टी-शर्ट, टोपी, आणि खाकी पँट) परिधान केलेला फोटो बाहेर आला. तिच्या सुरक्षेसाठी सहा सिक्रेट सर्व्हिस एजंटस् हॉटेलात उपस्थित असतात.‘नॅन्सीज्’ म्हणजे ओबामा कुटुंबाचे आवडते हॉटेल. ते जेव्हा केव्हा मार्था विनयार्डला भेट देतात तेव्हा आवर्जून या हॉटेलात जेवण करतात. एवढेच नाही तर हॉटेलचा मालक जो मोहबर हा ओबामांचा चांगला मित्रदेखील आहे. त्याने साशाला काम करण्याचे संधी उपलब्ध करून दिली. चार तासांच्या सकाळच्या शिफ्टमध्ये ती काम करते. आपल्या मुलांना खऱ्या आयुष्याची, मेहनतीची किंमत कळावी यासाठी राष्ट्राध्यक्षाच्या मुलीने असे काम करण्याची बाब खरोखरंच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.