आणखी एका माशाला ओबामांचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2016 5:06 PM
हवाई येथील समुद्र किनारपट्टी जैववैविध्यतेच्या सुरक्षिततेसाठी राखीव म्हणून घोषित करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे स्वागत म्हणून वैज्ञानिकांनी माशांच्या एका प्रजातीला त्यांचे नाव देण्याचे ठरवले आहे.
बराक ओबामा जर यावर्षी राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार होत असले तरी ते मोठी लेगसी मागे सोडून जात आहेत. हवाई येथील समुद्र किनारपट्टी जैववैविध्यतेच्या सुरक्षिततेसाठी राखीव म्हणून घोषित करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे स्वागत म्हणून वैज्ञानिकांनी माशांच्या एका प्रजातीला त्यांचे नाव देण्याचे ठरवले आहे.‘कुरे अॅटोल’मधील पापाहॅनौमोकुआकिया प्रवाळ क्षेत्रात राहणाऱ्या दाट तपकिरी व सोनेरी रंगाचे हे मासे आहेत. विविध प्रकारचे सुमारे ७ हजार सजीव प्रजाती येथे राहतात. प्रवाळ, सागरीजीव आणि इतर मौल्यवान घटकांसाठी संरक्षित केलेल्या पापाहॅनौमोकुआकिया सागरी राष्ट्रीय स्मारकापेक्षा चौपट मोठे क्षेत्र संरक्षित करण्याचा ओबामांनी निर्णय मागच्या आठवड्यात घेतला. १५ लाख चौ. किमीसह जगातील सर्वात मोठे संरक्षित सागरी क्षेत्र म्हणून ते आता ओळखले जाणार.या माशाच्या पाठीवर असणारा लाल व निळा ठिपका ओबामांच्या प्रचार मोहिमेच्या लोगोशी मिळता जुळता आहे. सागरी जीवशास्त्रज्ञ रिचर्ड पाईल यांनी सांगितले की, ओबामांच्या प्रचार मोहिमेच्या लोगोशी असलेले साधर्म्य केवळ योगायोग आहे. सागरी जीवनसृष्टीच्या संरक्षणासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही माशाच्या प्रजातीला त्यांचे नाव देत आहोत.बरं माशाच्या प्रजातीला ओबामांचे नाव देण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी २०१२ साली टेनसी रिव्हर इथिओस्टोमा येथे सापडलेल्या माशालादेखील ओबामांचे नाव देण्यात आले होते.